वैजापूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेस चे नगरसेवक व भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वैजापूर शहर विकास आघाडीचे उमेदवार शेख रियाज अकिल गब्बू शेठ यांची शुक्रवारी निवड झाली. त्यांना राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुवर्णा ठोंबरे यांनी सूचित केले तर नगरसेविका शेख सुमैय्या सोहेल यांनी अनुमोदन दिले. वैजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत आमदार सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी उपनगराध्यक्ष हाजी अकिल शेख यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आठ जागा लढवून चार ठिकाणी विजय मिळवत भाजपला चांगली साथ दिली होती. त्यामुळे भाजपाचे डॉ दिनेश परदेशीं यांनी दिलेला शब्द पाळला आहे. आम्हाला न्याय दिला, अशी प्रतिक्रिया उपनगराध्यक्ष रियाज शेख यांचे वडील अकिल शेख यांनी माध्यमाना दिली.
सकाळ मुख्याधिकारी भागवत बिघोत यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया राबवली. नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांच्यासह सर्व नगरसेवक हजर होते. उपनगरध्यक्ष पदासाठी भाजपतर्फे विशाल जीवनलाल संचेती यांनी देखील अर्ज दाखल केला. त्यांना नगरसेविका मोनाली खैरे यांनी सूचित केले तर राजेश गायकवाड यांनी अनुमोदन दिले. विशाल संचेती यांना वैजापूर शहर विकास आघाडीची शिफारस नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरवला.
स्वीकृत सदस्यांसाठी वैजापूर शहर विकास आघाडीतर्फे प्रकाश पंढरीनाथ चव्हाण व प्रशांत प्रभाकरराव कंगले यांचे तर शिवसेनेतर्फे संजय नानासाहेब बोरनारे यांचे अर्ज प्राप्त झाले. या अर्जाची छाननी होऊन तसेच अहर्ता तपासून त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून घोषित करण्यात आले व त्यांची नावे डॉ. दिनेश परदेशी व पारस घाटे यांना कळवल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध होईल अशी चर्चा मागील काही दिवसांपासून रंगत असताना निवडणूकीच्या दिवशी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वैजापूर शहर विकास आघाडी स्थापन करून आघाडीतर्फे रियाज शेख यांना उमेदवारी दिली. असे असतानाही भाजपतर्फे या पदासाठी विशाल संचेती यांनी स्वतंत्र अर्ज भरल्याने या निवडणुकीत नवीन ट्विस्ट निर्माण झाला होता.






