राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अनेक महानगरपालिकांमध्ये प्रस्थापितांना जोरदार धक्का बसला आहे. यात ठाणे महानगरपालिकेतील माजी महापौर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अशोक वैती यांनाही पराभवाचा फटका बसला. शिवसेना (उबाठा) पक्षाचे शहाजी खुस्पे यांनी वैती यांना पराभवाची धूळ चारली असून रविवारी खुस्पे यांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
यावेळी ठाकरे यांनी खुस्पे यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. मातोश्री निवासस्थानी झालेल्या या बैठकीत उद्धव यांनी खुस्पे यांच्या विजयी रणनीतीबाबत चर्चा केली. तसेच पुष्पगुच्छ देऊन सन्मानही केला. निष्ठेची लढाई यापुढे अशीच लढत राहा, असे ठाकरे यांनी खुस्पे यांना सांगितले.
या प्रभागातून शिवसेनेच्या पॅनलला कडवी झुंज देणारे संजय दळवी, वैशाली घाटवळ, अनिला हिंगे आणि त्यांचे पती अमोल हिंगे यांचेही ठाकरे यांनी कौतुक केले.






