शिवाजी पार्कला झळाळी

महाराष्ट्र टाइम्स

शिवाजी पार्क परिसराला नवी झळाळी मिळणार आहे. मुंबई महापालिकेच्या जी उत्तर वॉर्डने या कामांना सुरुवात केली आहे. आकर्षक दिवे बसवले जातील. भित्तीचित्रांवर स्पॉट लाइट्स लावले जातील. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ रोषणाई केली जाईल. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळी रोषणाईसह वॉटर फाउंटन उभारले जाईल. ही सर्व कामे मार्चपर्यंत पूर्ण होतील.

शिवाजी पार्कला झळाळी
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

दादरमधील शिवाजी पार्क हे सर्वांचे आवडते मैदान. या शिवाजी पार्कच्या परिसराला झळाळी देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेच्या जी उत्तर वॉर्डने घेतला आहे. त्यासाठी स्थापत्यासह यांत्रिकी-विद्युत कामे हाती घेऊन झळाळी दिली जाणार आहे. यामध्ये पार्क परिसरातील आकर्षक दिव्यांची दुरुस्ती, भित्तीचित्रावर स्पॉट लाइट, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ रोषणाई यांसह अन्य कामे केली जाणार आहेत. या आठवड्यात कामाला सुरुवात करून मार्चपर्यंत ती पूर्ण केली जाणार आहेत.

जुलै २०२५मध्ये शिवाजी पार्क मैदान परिसराची मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पाहणी केली होती. पदपथ आणि परिसराच्या अनुषंगाने स्थानिकांशी गगराणी यांनी संवादही साधला. मैदान परिसरात सुधारणा, नियमित देखभाल, दुरुस्ती तसेच, स्वच्छता करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना, परिसरातील कट्ट्यांची दुरुस्ती करताना पुरेशा प्रकाश व्यवस्थेच्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर या कामांचा अभ्यास करून प्रस्ताव तयार करण्यात आला होता. प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर निविदा काढून कंत्राटदाराची नियुक्तीही करण्यात आली आहे. आता शिवाजी पार्क परिसराला झळाळी देण्याचे काम या आठवड्यापासून सुरू केले जाणार आहे.

शिवाजी पार्कच्या संपूर्ण परिसरात आकर्षक दिवे बसवण्यात आले असून त्यांची कामे केली जातील. पार्काच्या गेटवरील भित्तीचित्रे ठळकपणे दिसण्यासाठी या भित्तीचित्रावर स्पॉट लाइट्स लावले जाणार आहेत. स्वर्गीय मीनाताई ठाकरे गेट शेजारील दीपस्तंभावरही रोषणाई केली जाणार आहे. याशिवाय, शिवाजी पार्क परिसरात माहिती फलकही लावले जातील. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळ येथे रोषणाईसह वॉटर फाउंटन करण्यात येणार आहे. यांसह अन्य कामे केली जाणार असून मार्च महिन्यापर्यंत कामे पूर्ण केली जाणार असल्याची माहिती सहायक आयुक्त, जी उत्तर वॉर्ड, विनायक विसपुते यांनी दिली.