मुंबई मॅरेथॉनच्या बदललेल्या मार्गाने विशेषतः शर्यतीच्या उत्तरार्धात कोस्टल रोडने स्पर्धकांचा चांगलाच कस पाहिला आणि त्यामुळे अनेक स्पर्धकांनी मॅरेथॉन सोडून दिली होती. आठ पुरुषांसह एकूण ११ एलिट स्पर्धकांनी शर्यत सोडली आणि त्यातील तिघांना रुग्णालयात दाखल केले होते, अशी माहिती परदेशी स्पर्धकांच्या समन्वयकांनी दिली.
गत वर्षीपर्यंत मुंबई मॅरेथॉनमध्ये पेडर रोडच स्पर्धकांचा कस बघत असे. हा टप्पा पार केल्यावर स्पर्धक सुखावत असत. मात्र, या वेळी कोस्टल रोडवरील चढ-उतार आणि परत चढ यामुळे स्पर्धक जेरीस आले. त्यातच शर्यतीच्या उत्तरार्धात उकाडा जास्त असतो आणि ते आव्हान जास्त होते, अशीच भावना विजेत्या परदेशी धावपटूंनी व्यक्त केली. ‘शर्यतीचा मार्ग कस पाहणारा नक्कीच होता. मात्र, मी त्यासाठी चांगली योजना आखली होती. चढ-उतार असल्यावर लय गवसणे महत्त्वाचे असते. त्याचबरोबर खडतर टप्प्यासाठी मी ताकद राखून ठेवली होती,’ असे सांगताना विजेता तादू अबाते देमे याने आव्हान किती खडतर होते, हेच सुचित केले. तिसरा आलेला मेऱ्हाई केसेते वेल्देमार्यम त्याच्याशी सहमत होता.
महिलांमधील विजेती केशी कालायो चेकोल त्याच्याशी सहमत होती. मात्र, तिने थेट मार्गावर टीका करणे टाळले. ‘स्पर्धा विक्रमासह शर्यत जिंकू शकेन, असेच सुरुवातीस वाटत होते. मात्र, या स्पर्धेच्या वेळी असणारे वातावरण कमालीचे आव्हानात्मक होते,’ असे तिने सांगितले. मात्र, थेट मार्गाबाबत विचारल्यावर मला तरी चढ-उताराचा फारसा त्रास झाला नाही, अशी भावना तिने व्यक्त केली. दुसरी आलेली किदसान आलेमा गेब्रेमेधिन आणि तिसरी आलेली गोज्जाम सेगाये एन्यू यांनी आपल्याला शर्यतीच्या मध्यास; तसेच अंतिम टप्प्यात खूपच थकवा जाणवत होता. मात्र, त्यातून स्वतःला सावरून पुन्हा जोषात प्रयत्न केले. अर्थात, पूर्ण वेगाने धावू शकलो नाही, असे नमूद केले.
दरम्यान, रुग्णालयात दाखल केलेल्या दोन पुरुष धावपटूंना दुपारच्या सुमारास सोडण्यात आले. काही वेळातच महिला धावटूसही सोडण्यात येईल, असे संयोजकांकडून सांगण्यात आले. परदेशी स्पर्धकांच्या समन्वयकांनी शर्यतीचा मार्ग अपेक्षेपेक्षा जास्त खडतर होता. अखेरचे काही किलोमीटर शिल्लक असताना कोस्टल रोड चे आव्हान सोपे नाही. त्यातच समुद्रकिनाऱ्यावरून फारसे वारेही नसल्यामुळे लाभणारा गारवाही लाभला नाही, याकडे लक्ष वेधले. सकाळी साडेआठनंतर ऊन वाढल्याने आव्हानांत वाढ झाली. त्यात कोस्टल रोड हा मार्गही धावपटूंची कसोटी बघत होता. मुंबई मॅरेथॉन स्पर्धकांच्या मानसिक कणखरतेची परीक्षा घेते. मार्गातील आव्हाने वाढली आहेतच. शिवाय सुरुवातीपासून मार्गाचा भाग असलेला पेडर रोडही शर्यतीच्या अखेरच्या टप्प्यात म्हणजेच ३५ किलोमीटरनंतर येतो, असे भारतीय विजेता कार्तिक करकेरा याने सांगितले.






