महावितरणने घेतला वृद्ध रुग्णाचा बळी

Contributed byकार्यकारी अभियंता|महाराष्ट्र टाइम्स

म्हासावद येथे महावितरणने वीजपुरवठा खंडित केल्याने ऑक्सिजनवर असलेल्या एका वृद्ध रुग्णाचा मृत्यू झाला. वीज नसल्याने रुग्णालयातील रुग्णांना उघड्यावर उपचार द्यावे लागले. काही रुग्णांना तातडीने हलवण्यात आले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. ग्रामीण भागात वारंवार वीज खंडित झाल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे.

महावितरणने घेतला वृद्ध रुग्णाचा बळी
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

म्हसावद (ता. शहादा, जि. नंदुरबार) परिसरात महावितरणच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वीजपुरवठा खंडित केल्याने ऑक्सिजनवर उपचार घेत असलेल्या वृद्ध रुग्णाला आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन मिळू शकला नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच बिघडली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. तसेच अनेक रुग्णांना अक्षरशः रस्त्यावर उपचार द्यावे लागल्याची संतापजनक परिस्थिती निर्माण झाली होती.

वीज वितरण कंपनीने बुधवारी सकाळी संबंधित खासगी रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित केला होता. त्याचवेळी रुग्णालयात इस्लामुद्दीन नझरुद्दीन लोहार (रा. म्हसावद, ता. शहादा) यांच्यावर उपचार सुरू होते. रात्रभर सुरळीत ऑक्सिजनपुरवठा त्यांना मिळाला नसल्याने गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे मयताच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त केला. वीज नसल्यामुळे रुग्णालय प्रशासनाला रुग्णांना उघड्यावर उपचार देण्याची वेळ आली. काही रुग्णांना तातडीने शहादा येथे हलवण्यात आले, तर काही रुग्णांवर सध्या दुसऱ्यांकडून वीजपुरवठा घेऊन उपचार सुरू आहेत.

दरम्यान, म्हसावद ग्रामीण रुग्णालयाची इमारत सध्या बांधकामात असल्याने, हे रुग्णालय राणीपूर येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. परिणामी म्हसावदच्या ५० किलोमीटरच्या परिसरात एकही शासकीय रुग्णालय उपलब्ध नसल्याने नागरिकांना खासगी रुग्णालयांवरच अवलंबून राहावे लागत आहे. अशा परिस्थितीत महावितरणकडून खासगी रुग्णालयावर करण्यात आलेली कारवाई ही अत्यंत बेजबाबदार असून, रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण करणारी असल्याचा आरोप होत आहे.

महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधूनही वीजपुरवठा सुरळीत न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ग्रामीण भागात वारंवार वीज खंडित होत असल्यामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतो.