नोकरी-व्यवसायामुळे कामाचा व्याप कितीही वाढला असला, तरी महिलांनी संक्रातीचा हळदीकुंकू समारंभ साजरा करण्याची परंपरा सुरू ठेवली आहे. मात्र, या पारंपरिक स्नेहमेळाव्यांच्या मूळ गाभ्याला धक्का न लावता महिलांनी आधुनिक पद्धतीने हा सण साजरा करण्यास सुरुवात केली आहे. एरवी व्यग्र दिनचर्येमुळे स्नेहजनांना भेटण्यासाठी वेळ मिळत नसल्याने हळदीकुंकवाच्या निमित्ताने महिला आता एकत्र येत आहेत. या कार्यक्रमांसाठी हॉटेल, रिसॉर्ट, फार्म हाउसमध्ये बुकिंग करून महिला दिवसभर वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करीत आहेत.
हळदीकुंकवाच्या समारंभांचे बदलते स्वरूप समाजमाध्यमांवरील व्हिडिओ, रील्स आणि फोटोंमध्येही सध्या बघायला मिळते आहे. संक्रांतीचे वाण-हळदीकुंकू समारंभाचे व्यवस्थापन करणाऱ्या इव्हेंट कंपन्यांनाही मागणी वाढली आहे. यात वाण, हळदीकुंकू यांसह नाश्ता, जेवण, काही वेळा मनोरंजनाचे कार्यक्रम असे पॅकेज देण्यात येत आहेत. उत्साही महिलांकडून हळदीकुंकवासाठी पेहेरावाची विशेष थीम ठरविण्यास पसंती मिळते आहे.
हळदीकुंकवाकरिता काळी साडी आणि हलव्याचे दागिने परिधान करून खास फोटोशूट केले जाते. रिल्स रसिद्ध करण्यात येत आहेत. बाजारात हलव्याचे दागिने मिळतातच. मात्र, आपल्याला हव्या तशा डिझाइनचे हलव्याचे दागिने खास तयार करून घेण्यालादेखील मागणी आहे.
घरगुती वस्तूंचे उपयोगी वाण देण्याबरोबरच खर्चिक; पण आकर्षक वस्तू देणाऱ्यांकडेही महिलांचा कल आहे. इव्हेंट म्हणून हळदीकुंकू समारंभ आयोजित करणाऱ्या महिलांकडून महगाड्या वस्तू वाण म्हणून देण्यात येत आहेत. पर्यावरण जागृतीसाठी झाडांची रोपे, बिया, मातीच्या, लाकडी वस्तूंचे वाण देत आहेत. एवढंच नव्हे, तर विविध वस्तूंचे हॅम्पर्सही देणाऱ्यांची संख्या वाढली आहे.









