सहा लाखांचे वेतन लाटले

महाराष्ट्र टाइम्स

शासकीय अधिकाऱ्यांची खोटी स्वाक्षरी करून आणि बनावट कागदपत्रे सादर करून लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी विनाअनुदानित शाळेला अनुदानित मान्यता मिळवली. शालार्थ वेतन प्रणालीत नाव समाविष्ट करून शासनाकडून थकीत आणि नियमित वेतन लाटले. औरंगाबाद खंडपीठातही बनावट कागदपत्रांनी दिशाभूल केली.

six lakhs financial fraud fake documents of education officials exposed

बनावट कागदपत्रे , शिक्षणाधिकाऱ्यांची खोटी स्वाक्षरी करून शासनाची सहा लाखांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी इकरा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम अब्दुल मजीद सालार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलिस ठाण्यात पाच जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात जळगाव शहर पोलिसांनी उपशिक्षक सय्यद अमरुल्लाह सय्यद चाँद कासार, त्यांचे वडील तथा संस्थेचे उपाध्यक्ष सय्यद चाँद सय्यद अमीर (दोन्ही रा.१०६, कोळीपेठ, मन्यारवाडा, जळगाव), तत्कालीन सेवानिवृत्त मुख्याध्यापक शेख नईमोद्दीन शेख अफजलोद्दीन (रा, नशिराबाद), जिल्हा परिषदेचे वरिष्ठ सहाय्यक राजेंद्र रघुनाथ चौधरी (रा. जळगाव) आणि भडगाव उर्दू शाळेचे उपशिक्षक शेख जहीर शेख सलाऊद्दीन (रा. शिवाजीनगर, जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या बनावट आदेशाच्या आधारे संशयित आरोपींनी विनाअनुदानितवरून अनुदानित तत्त्वावर मान्यता मिळवली आणि ‘शालार्थ वेतन प्रणाली’मध्ये नाव समाविष्ट केले. इतकेच नव्हे तर, औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून बनावट कागदपत्रांद्वारे न्यायालयाचीही दिशाभूल केली. याद्वारे शासनाकडून थकीत वेतनाचे ६ लाख २३ हजार ९७० रुपये आणि त्यानंतरचे नियमित वेतन असे एकूण लाखो रुपये लाटून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.