धनादेश अनादरासाठी कैद

महाराष्ट्र टाइम्स

भावसिंगपुरा येथील जमीन व्यवहारातील सहा लाख रुपये परत करण्यासाठी सय्यद शहाबुद्दीन कादरी याने दिलेला तीन लाखांचा धनादेश अपुऱ्या निधीमुळे बाऊन्स झाला. या प्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी. डी. चोखाट यांनी कादरी यास दोषी ठरवले. त्याला सहा महिने साधी कैद आणि तक्रारदार शेख हारुण शेख चांद यांना पाच लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची शिक्षा सुनावण्यात आली. धनादेश चोरीला गेल्याचा बचाव फेटाळण्यात आला.

धनादेश अनादरासाठी कैद
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

जमीन व्यवहारातील रक्कम परत करण्यासाठी दिलेला धनादेश बँकेत अपुऱ्या निधीअभावी अनादरित झाला. या प्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी. डी. चोखाट यांनी आरोपी सय्यद शहाबुद्दीन कादरी यास दोषी ठरवून सहा महिने साधी कैद व तक्रारदारास पाच लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची शिक्षा सुनावली.

तक्रारदार शेख हारुण शेख चांद व आरोपी सय्यद शहाबुद्दीन कादरी यांची पाच वर्षांपासून ओळख होती. आरोपीने भावसिंगपुरा परिसरातील एक प्लॉट तक्रारदारास सहा लाख रुपयांना विकण्याचा व्यवहार केला होता. काही कारणास्तव विक्रीखत न झाल्याने व्यवहार रद्द करण्यात आला. व्यवहाराची रक्कम परत करण्यासाठी आरोपीने तक्रारदारास प्रत्येकी तीन लाख रुपयांचे दोन धनादेश दिले होते. तक्रारदाराने त्यापैकी एक धनादेश बँकेत जमा केला असता तो ‘अपुऱ्या निधीअभावी’ परत आला. यानंतर तक्रारदाराने कायदेशीर नोटीस बजावली; मात्र तरीही आरोपीने रक्कम परत न केल्याने न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली. सुनावणी दरम्यान धनादेश चोरीला गेल्याचा व त्याचा गैरवापर झाल्याचा बचाव आरोपीच्या वतीने न्यायालयीन युक्तिवादामध्ये करण्यात आला.

मात्र, धनादेश चोरीस गेल्याबाबत कोणतीही तक्रार पोलिस ठाण्यात दाखल नसल्याने न्यायालयाने आरोपीचा बचाव अमान्य केला.

दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर तक्रारदाराच्या वतीने सादर करण्यात आलेले करारनामे व साक्षीदारांचे पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या कलम १३८ अंतर्गत दोषी ठरवले.

नुकसानभरपाईची रक्कम न भरल्यास आरोपीस आणखी दोन महिने साधी कैद भोगावी लागणार आहे. तक्रारदाराच्या वतीने अ ॅड. परवेज शेख, तर आरोपीच्या वतीने अ ॅड. एस. के. जैदी यांनी काम पाहिले.