Gold Mangalsutra Theft Crime Increasing In Chhatrapati Sambhajinagar
मंगळसूत्र चोरट्यांचा धुमाकूळ कायम
महाराष्ट्र टाइम्स•
छत्रपती संभाजीनगरमध्ये मंगळसूत्र चोरीच्या घटना वाढल्या आहेत. दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावले. एका घटनेत नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरटे पकडले जाण्यापूर्वीच दुचाकी सोडून पळून गेले. या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा मंगळसूत्र चोरीच्या घटनांनी नागरिकांना हादरवून सोडले आहे. दुचाकीवरून फिरणाऱ्या दोन चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी महिलांना लक्ष्य करत त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावले. एका घटनेत चोरटे यशस्वी झाले, तर दुसऱ्या घटनेत नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्यांचा डाव फसला आणि त्यांना दुचाकी सोडून पळून जावे लागले.
गुरुवारी सायंकाळी शिवाजीनगर परिसरात विजयश्री तेललवार (वय ५५) पायी जात असताना, दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे दीड लाख रुपये किमतीचे अडीच तोळ्यांचे मिनी गंठण हिसकावून पोबारा केला. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यानंतर लगेचच, सायंकाळी सहाच्या सुमारास मुकुंदवाडी रस्त्यावर वैशाली विश्वंभर डबे (वय ६०) यांच्या गळ्यातील बेंटेक्सचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावले. मात्र, एका कारचालकाने प्रसंगावधान दाखवत चोरट्यांचा पाठलाग केला. काही अंतरावर कार आडवी लावून चोरट्यांना गाठले. पकडले जाणार हे लक्षात येताच चोरट्यांनी आपली दुचाकी सोडून दिली आणि पळून जाण्यात यशस्वी झाले. या घटनांमुळे शहरात पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.