ठाणे जिल्ह्यात ‘मामाचं पत्र’ हरवलं!

महाराष्ट्र टाइम्स

ठाणे जिल्ह्यात 'मामाचं पत्र' हरवलं आहे. एकेकाळी आनंदाची बातमी आणणारा पोस्टमन आता कमी झाला आहे. पत्रांच्या पेट्यांची संख्या घटली आहे. पोस्टमनच्या पिशवीत आता पत्रांऐवजी आधार कार्ड, एटीएम कार्ड आणि पार्सल जास्त असतात. कामाचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. तरीही टपाल सुविधा आजही पोहोचते.

letter from uncle lost in thane district decrease in number of letters and postmen

‘ मामाचं पत्र हरवलं...’ हे बालगीत आता केवळ गाण्यापुरतेच मर्यादित उरले आहे की काय, अशी परिस्थिती ठाणे जिल्ह्यात निर्माण झाली आहे. एकेकाळी घराघरात आनंदाची बातमी घेऊन येणारा पोस्टमन आणि नाक्यावरची ती हक्काची 'लाल रंगाची टपाल पेटी' आता काळाच्या पडद्याआड जाताना दिसत आहे.

काही वर्षांपूर्वीपर्यंत परदेशात किंवा परगावी असलेल्या मुलाचे पत्र येणार म्हणून आई डोळ्यात तेल घालून पोस्टमनची वाट पाहायची. पत्राच्या त्या कागदाला एक वेगळाच मातीचा सुगंध असायचा आणि हस्ताक्षरातून मायेचा ओलावा जाणवायचा. आज ठाणे जिल्ह्यातील पत्रांच्या पेट्यांची संख्या ७३०वरून ६१० वर आली आहे. जिल्ह्याभरात पोस्टमनची संख्या आता केवळ २९२ उरली आहे. विशेषतः ठाणे शहरात जिथे पूर्वी ३४६ पोस्टमन होते, तिथे आता ही संख्या घटताना दिसत आहे.

शहापूर, मुरबाड आणि भिवंडी सारख्या ग्रामीण भागांत आजही ८१५ गावांपर्यंत टपाल सुविधा पोहोचते, परंतु तिथेही पत्रांपेक्षा सरकारी कागदपत्रे आणि पार्सलचे प्रमाण जास्त आहे. २०२२-२३पासून ते २०२४-२५ पर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, ठाणे जिल्ह्यात टपाल कार्यालयांची संख्या १८८वरून १९९ पर्यंत वाढली आहे. विशेषतः शहापूर -५६ आणि कल्याण -३४ यांसारख्या तालुक्यांमध्ये टपाल कार्यालयांचे जाळे विस्तारलेले आहे. भिवंडी आणि शहापूरमधील दुर्गम भागांत आजही टपाल विभागाचा संपर्क महत्त्वपूर्ण मानला जातो.

आज पोस्टमनच्या पिशवीत पत्रांऐवजी आधार कार्ड, एटीएम कार्ड, विमा पॉलिसी आणि ऑनलाईन शॉपिंगची पार्सल जास्त असतात. ठाणे जिल्ह्यात आजही १९९ पोस्ट आणि एकूण २९२ कर्मचारी कार्यरत आहेत, पण त्यांच्या कामाचे स्वरूप आता पूर्णपणे बदलले आहे.