भारतीय विद्यापीठ संघातर्फे आयोजित पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय संशोधन महोत्सवा (अन्वेषण)मध्ये मुंबई विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत दोन सुवर्ण आणि दोन ब्राँझ पदके पटकावली. गुजरातमधील सरदार पटेल विद्यापीठात २० आणि २१ जानेवारी रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने सादर केलेल्या सहा गटांपैकी चार गटांत प्रावीण्य मिळवले आहे.
मूलभूत शास्त्रे आणि सामाजिक शास्त्रे या गटांत मुंबई विद्यापीठाला प्रत्येकी एक सुवर्णपदक मिळाले, तर अभियांत्रिकी व तंत्रज्ञान आणि आरोग्य विज्ञान या गटांत ब्राँझ पदकांची कमाई केली. दोन दिवस चाललेल्या या संशोधन महोत्सवात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि गोवा राज्यांतील एकूण ३२ विद्यापीठांचा सहभाग होता.
मूलभूत शास्त्रे गटात राहुल मिश्रा यांनी ‘मलेरिआचे नियंत्रण’ या संशोधन प्रकल्पाचे सादरीकरण करत प्रथम क्रमांक मिळवला. सामाजिक शास्त्रे गटात तेजस पवार यांनी ‘समाजाच्या विविध परिमाणांचा अभ्यास करण्यासाठी इतिहासाचे वर्गीकरण’ या प्रकल्पाद्वारे सुवर्ण पदक पटकावले. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान गटात महेश पुजारी, एकता कदम आणि अमर वर्मा यांनी ‘अती थंड माध्यमाविना कार्य करणारे नावीन्यपूर्ण साधन’ या संकल्पनेवर आधारित प्रकल्प सादर करून ब्राँझ पदक मिळवले. आरोग्य विज्ञान गटात संकेत गुलभिले आणि वर्षा छाब्रिया यांनी ‘मूत्र विश्लेषक’ या प्रकल्पाद्वारे ब्राँझ पदकाची कमाई केली.
विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती, नवकल्पकता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ओळखून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भारतीय विद्यापीठ संघाच्या निर्देशानुसार, सन २००८पासून या संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. कृषी, मूलभूत शास्त्रे, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, वैद्यक व औषधशास्त्र, सामाजिक शास्त्रे, मानव्यविद्या, वाणिज्य, व्यवस्थापन, विधी तसेच आंतरविद्याशाखीय संशोधन अशा सहा गटांत पोस्टर, मॉडेल आणि मौखिक सादरीकरणाद्वारे ही स्पर्धा घेतली जाते.
मुंबई विद्यापीठाच्या या यशाबद्दल कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे आणि विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनिल पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.






