सोयाबीन, सूर्यफूल व पामतेलात लिटरमागे पाच रुपयांची दरवाढ झाली आहे व नजिकच्या काळात आणखी पाच रुपयांची दरवाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आयातीच्या प्रमाणात घट झाल्याने ही दरवाढ झाल्याचे समोर येत आहे.
अलीकडे काही देशांतर्गत वाढलेले ताणतणाव, होत असलेले हल्ले व यात मोठ्या प्रमाणातील नुकसानीच्या भीतीतून खाद्यतेलांच्या आयातीवर परिणाम होत आहे. त्यामुळेच आवक घटून खाद्यतेलाच्या घाऊक विक्रीचे दरही वाढले आहेत. त्यानुसार सोयाबीन तेल हे लिटरमागे १४५ रुपये, सूर्यफूल तेल लिटरमागे १६० रुपये व पामतेल हे लिटरमागे ११० रुपयांवर पोहोचले आहे. खाद्यतेलाचा जुना माल संपल्यानंतर तिन्ही तेलांचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इतर खाद्यतेलांमध्ये सरकी तेल लिटरमागे १४० रुपये, करडी तेल ३२० ते ३२५ रुपये, शेंगदाणा तेल १९० ते १९५ रुपये या प्रमाणे स्थिर आहे. दरम्यान, आयात घटल्यामुळे तीन प्रकारच्या खाद्यतेलांत दरवाढ झाली आहे व आणखी दरवाढीची शक्यता खाद्यतेलाचे व्यापारी जगन्नाथ बसैये यांनी सांगितले.






