छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. मोहर आलेल्या आंबा फळबागांना फटका बसण्याची भीती आहे. ढगाळ वातावरणामुळे भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे फळगळ किंवा मोहर गळ होते. या परिस्थितीत शेतकऱ्यांनी कृषितज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे, असा सल्ला देण्यात आला आहे.
‘जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा आंबा मोहराला फटका बसला आहे. फळबागांचे नुकसान होण्याची भीती आहे. या परिस्थितीत आंबा मोहराचे परपरागीकरण चांगले होण्यासाठी हातांनी अथवा झाडूनी हळूवारपणेे फांद्या हलविल्यास फळधारणा वाढीसाठी मदत होणार आहे,’ असे प्रतिपादन हिमायतबाग येथील केसर आंबा गुणवत्ता केंद्राचे प्रकल्प प्रमुख डॉ. संजय पाटील यांनी केले.
टाकळी राजेराय (ता. खुलताबाद) येथील केसर आंबा बागेस वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या केसर आंबा गुणवत्ता केंद्राचे प्रकल्प प्रमुख डॉ. संजय पाटील यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी आंबा बागायतदार पंडितराव क्षीरसागर, किरण मालोदे, रविकांत काळे, मच्छिंद्र राठोड, नाना पवार उपस्थित होते.
‘पाऊसमान चांगले झाल्याने आंबा बागा सर्वदूर बहरलेल्या दिसत आहेत. काही ठिकाणी बाजरी आकाराची फळधारणा झालेली आहे. या ठिकाणी परागीकरण होऊन नर फुले सुकलेली आहेत, यावर बुरशीचा प्रकोप होऊन भुरीचा धोका टाळण्यासाठी झाडाच्या फांद्या हळूवारपणे झाडूच्या सहाय्याने हलविल्यास सुकलेली फुले पडून आणि इतर फुलातील जिवंत परागकण मादी फुलांवर पडून फळधारणा वाढीसाठी मदत होऊ शकते. केसर आंबा बागेत ५० टक्के बाजरी आकाराची फळे झाली असल्यास पाणी व्यवस्थापन करणेदेखील फळगळ थांबविण्यासाठी फायदेशीर ठरू शकते,’ असे पाटील म्हणाले.






