विमानतळाभोवती पर्यायी रस्ता

Contributed byकेंद्रीय राज्यमंत्री|महाराष्ट्र टाइम्स

पुणे विमानतळाभोवती पर्यायी रस्ता लवकरच तयार होणार आहे. अनेक विकासकामांचा आढावा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतला. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य स्मारक, छत्रपती संभाजी महाराज स्मारक, बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास, बाळासाहेब ठाकरे कलामंदिर, गदिमा स्मारक, लहुजी वस्ताद साळवे स्मारक यांसारखी कामे वेगाने पूर्ण होतील. नदी संवर्धन आणि पाणीपुरवठा योजनांची कामेही गतीने होतील.

विमानतळाभोवती पर्यायी रस्ता
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

एनडीए (चांदणी) चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्मारक, डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक, बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास, कोथरूड येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कलामंदिर, गदिमा स्मारक, लहुजी वस्ताद साळवे स्मारक आदी कामांचा आढावा घेऊन ही सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

‘लोहगाव येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणासाठी विमानतळाभोवती पर्यायी रस्ता तयार केला जाणार आहे. येरवडा कारागृह ते विमानतळ आणि कल्याणीनगर ते विमानतळ या रस्त्यांच्या विस्तारीकरण व सौंदर्यीकरणासाठी आवश्यकतेनुसार लवकरच भूसंपादन केले जाईल,’ अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

शहरातील विविध योजनांच्या व विकासकामांच्या आढाव्यासाठी घेतलेल्या बैठकीनंतर मोहोळ यांनी ही माहिती दिली. महापौर मंजूषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त योगेश म्हसे, ‘महामेट्रो’चे कार्यकारी संचालक श्रावण हर्डीकर, लोहगाव विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांच्यासह हवाई दलाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.

राष्ट्रीय नदीसंवर्धन प्रकल्पांतर्गत नदीकाठ सुधार आणि नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या (जायका) कामाचाही आढावा घेऊन काम वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना मोहोळ यांनी दिल्या; तसेच समान पाणीपुरवठा योजनेच्या अंतिम टप्प्यात उर्वरित साठवणूक टाक्यांचे व जलवाहिन्यांचे; तसेच मीटर बसवण्याचे काम त्वरित पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. ‘शहरातील वाढते प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात, पदपथ अतिक्रमणमुक्त करावेत,’ अशा सूचनाही त्यांनी केल्या. मोहोळ यांच्या संकल्पनेतून आणि पुणे महापालिकेच्या माध्यमातून साकारलेल्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाची नवीन इमारत आणि वसतिगृह इमारतीच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन हे कामही निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात यावे, असे निर्देशही त्यांनी दिले.