विहारचा ‘विसर्ग’ भागवणार तहान

महाराष्ट्र टाइम्स

मुंबईकरांची पाण्याची तहान भागवण्यासाठी विहार तलावातील अतिरिक्त पाण्याचा वापर केला जाणार आहे. हे पाणी भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाठवले जाईल. या प्रकल्पाचे काम सुरू असून पुढील पावसाळ्यापूर्वी ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यात वाढ होईल. या कामासाठी १०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

विहारचा ‘विसर्ग’ भागवणार तहान
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव काठोकाठ भरून वाहू लागल्यानंतर या पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. अशाचप्रकारे विहार तलावातून विसर्ग करण्यात येणारे पाणी भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रात वळवून ते पिण्यासाठी वापरण्यात येणार आहे. या कामाला सुरुवात झाली असून, पुढील वर्षाच्या पावसाळ्याआधीच हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मुंबई महापालिकेने ठेवले आहे.

मुंबईला विहार, तुळशी, तानसा, मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा आणि भातसा या जलस्रोतांतून पाणीपुरवठा केला जातो. हे जलस्रोत मुंबई शहरापासून सुमारे १०० किलोमीटर व त्यापेक्षाही जास्त अंतरावर आहेत. मुंबई शहराच्या हद्दीत केवळ विहार आणि तुळशी तलाव आहेत. सातही तलावांतून दररोज चार हजार दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होतो. विहार, तुळशी तलावांची पाणीसाठवण क्षमता कमी असून हे तलाव लहान आहेत. विहार तलावाची पाणीसाठवण क्षमता ही २७ हजार ६९८ दशलक्ष लिटर आहे. या तलावक्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यास ते तुडुंब भरते. परिणामी, त्यातून जादा पाण्याचा विसर्ग करावा लागतो. या पाण्याचाही वापर करता येईल, अशी योजना मुंबई महापालिकेने तयार केली आहे.

विहार तलावाच्या किनाऱ्यावर २०० दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) क्षमतेचे पम्पिंग स्टेशन बांधण्याचे काम सुरू असून, या कामासाठी एका कंपनीचीही निवड केली आहे. या अतिरिक्त साठवण पाण्यामुळे पावसाळ्यात शहराच्या दैनंदिन पाणीपुरवठ्यात भर पडणार आहे. प्रकल्पासाठी १०० कोटी रुपयांचा खर्च आहे. प्रकल्पात विहार तलावातून बाहेर पडणारे अतिरिक्त पाणी पम्पिंग स्टेशनमध्ये वळवले जाईल, जे पुढे भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रात पाठवले जाईल. त्यानंतर शुद्ध केलेले पाणी शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या कामाला सध्या गती दिली जात आहे.

सात जलाशयांतून मुंबईला दररोज चार हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. त्यानंतर पाणी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत वाहून आणण्याचे काम दोन हजार ४०० मि.मी ते तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिन्यांद्वारे आणि पाच हजार ५०० मिलीमीटर व्यासाच्या काँक्रीटच्या भूमिगत जलबोगद्यांच्या साह्याने होते. सुमारे ५० टक्के पाणीपुरवठा हा उदंचन व्यवस्था वापरून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणला जातो. निर्जंतुकीकरण केलेले पाणी एका महासंतुलन जलाशयात साठवून पुढील वितरणासाठी शहरात ठिकठिकाणी असलेल्या सेवा जलाशयांपर्यंत पोहोचवले जाते. आता विहार तलावातील विसर्ग पाण्याचीही भर पडेल.