राष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट महोत्सव उत्साहात

महाराष्ट्र टाइम्स

मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात २८ फेब्रुवारी व एक मार्चला राष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट महोत्सव २०२६ उत्साहात पार पडला. देशभरातील तरुण चित्रपटनिर्मात्यांनी ३० निवडक चित्रपटांचे प्रदर्शन केले. दिग्दर्शक रवी उद्यावर, पायल किनाके, अभिनव दीप यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. ज्युरी आणि मास्टरक्लास सत्रांत चित्रपटसृष्टीतील विविध पैलूंवर मार्गदर्शन झाले. 'पानपंख'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.

राष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट महोत्सव उत्साहात
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात २८ फेब्रुवारी व एक मार्चला रंगलेला ' राष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट महोत्सव २०२६' उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. राष्ट्रीय कला मंच, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि विद्यार्थी निधी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा दोन दिवसीय महोत्सव आयोजित करण्यात आला होता. देशभरातील तरुण चित्रपटनिर्मात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध भाषांतील ३० निवडक चित्रपटांचे प्रदर्शन केले.

महोत्सवाचे उद्घाटन दिग्दर्शक रवी उद्यावर, स्वागत समिती सचिव राज कांबळे, अभाविप राष्ट्रीय मंत्री पायल किनाके, राष्ट्रीय कला मंच संयोजक अभिनव दीप, एनएसएफएफ संयोजक सौम्या चौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले. ज्युरी ब्रिफिंग सत्रात निधी सिंह धर्मा, अमरनाथ झा, राहुल सुहास, नीरज कुमार मिश्रा, वंदिता चक्रदेव आणि विशाल चतुर्वेदी आदी मान्यवरांनी माध्यमांची भूमिका, बदलते चित्रपटविश्व आणि जबाबदार कथनशैलीवर मार्गदर्शन केले.

चार मास्टरक्लास सत्रांत अभिजीत देशपांडे, सुदीप लाहिरी, केदार गायकवाड आणि व्ही. एन. आदित्य यांनी पटकथा, तंत्रज्ञान, छायांकन व सिनेमाची नैतिकता यावर सखोल चर्चा केली. 'एआय आणि भारतीय सिनेमाचे भविष्य' या विषयावरील विशेष पॅनेल चर्चेत पूजा कदम व अविनाश त्रिपाठी सहभागी झाले. समारोप सोहळ्यास क्रिएटिव्ह डायरेक्टर, बिर्ला स्टुडिओज, महर्षि शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पुरस्कार वितरणात 'पानपंख'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळाला; 'सोंगटी' व 'सीझ'ला विशेष प्रशंसा, 'सांझा कुआं'ला सर्वोत्कृष्ट संगीत, 'रिहा'ला संपादन, 'बाप रे बाप'च्या दिग्दर्शकाला युवा दिग्दर्शक, तर 'द क्व्यू'ला आशादायी आवाज पुरस्कार देण्यात आला. तरुणांनी भारतीय सिनेमाचा अभ्यास करून नाविन्यपूर्ण व जबाबदार सृजन करावे, असा संदेश मान्यवरांनी दिला.