राणीच्या बागेत ‘सिंह’गर्जना दुर्मीळ

महाराष्ट्र टाइम्स

मुंबईच्या राणीच्या बागेत सिंह आणण्याचे प्रयत्न गेल्या चार वर्षांपासून सुरू आहेत. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले असूनही सिंह अजून आलेले नाहीत. महापौर रितू तावडे यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून सिंहाची जोडी मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. बागेत सध्या २१ पेंग्विन असून त्यांच्या कक्षाचा विस्तार केला जात आहे. सुमारे ३५० प्राणी बागेत आहेत.

राणीच्या बागेत ‘सिंह’गर्जना दुर्मीळ
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

भायखळ्यातील जिजामाता उद्यान व प्राणी संग्रहालयात ( राणी बाग ) गेल्या चार वर्षांपासून सिंहाच्या जोडी, लांडगे यासारखे प्राणी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, राणीच्या बागेत अद्यापही हे प्राणी आलेच नाहीत. उलट प्राणी येण्याआधी त्यांच्यासाठी विविध सुविधा निर्माण करून मुंबई महापालिकेने कोट्यवधी रुपयेही खर्च केले. राणी बागेत आशियाई सिंहाची जोडी मिळावी, यासाठी महापौर रितू तावडे यांनी गुजरात मुख्यमंत्र्यांसह वनमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.

राणीच्या बागेत विविध प्राणी, पक्ष्यांबरोबरच इथले नानाविध सौंदर्य पाहण्यासाठी मुंबई, राज्यासह देशभरातील पर्यटक या बागेला भेट देतात. पर्यटकांना आणखी काही नवीन प्राणी पाहण्यास मिळावे यासाठी गेल्या चार वर्षांपासून अधिक काळापासून सिंह ाची जोडी आणण्यासाठी प्रयत्न होत आहेत. झेब्राच्या बदल्यात गुजरातच्या जुनागड येथील सक्करबाग येथून सिंह मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. झेब्रा मिळवण्यासाठी मुंबईतील राणीचा बाग प्रशासनाने परदेशातील प्राणी संग्रहालयाशीही चर्चा केली. त्यात यश मिळाले नाही. राणीच्या बागेत सिंहासाठी पिंजरे, पर्यटकांसाठी प्रेक्षक गॅलरी आदी सुविधाही तयार केल्या आणि त्या सुविधेसाठी आठ कोटी २५ लाख रुपये खर्च केले. सिंहच न आल्याने हा खर्च वायाच गेला आहे. राणीच्या बागेला सिंह मिळावे यासाठी गुजरातमधील सक्करबाग प्राणीसंग्रहालय, हैदराबादमधील प्राणीसंग्रहालय आणि गुजरातमधील केवडिया प्राणीसंग्रहालयाशी चर्चा करून त्यांना पेंग्विनच्या दोन जोडी देण्याची तयारीही महापालिकेने दर्शवली. मात्र त्यात अपयशच येत गेले. चार वर्षांनंतर मुंबईला महापौर मिळाल्यानंतर राणी बागेतील सिंहाची जोडी आणण्यासाठी महापौर रितू तावडे यांनीच पुढाकार घेतला आहे. गुजरातमधील सक्करबाग प्राणीसंग्रहालयातील सिंहाची जोडी मिळवण्यासाठी महापौरांनी गेल्याच आठवड्यात गुजरातचे मुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांना पत्र पाठवल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. महापालिका अधिकाऱ्यांना पाठपुरावा करण्याचे निर्देशही महापौरांनी दिले आहेत.

पेंग्विन कक्षाचा विस्तार

राणी बागेत २१ पेंग्विन आहेत. वाढती पेंग्विनसंख्या पाहता कक्षाचा विस्तार करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. राणीची बाग २,१०,४३७ चौरस मीटर क्षेत्रफळात असून ३७,९०० चौरस मीटर क्षेत्रफळ प्राण्यांच्या पिंजऱ्यांनी व्यापले आहे. बागेत बिबट्या, कोल्हे, तरस असे सुमारे ३५० प्राणी आहेत.