‘महावितरण’समोर उद्योजकांचा अडचणींचा पाढा

महाराष्ट्र टाइम्स

नाशिक इंडस्ट्रीज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (निमा) महावितरण कंपनीसोबत बैठक घेतली. सिन्नर औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांनी वीजजोडणी आणि वाढीव वीजभाराबाबत समस्या मांडल्या. नवीन उपकेंद्राची उभारणी आणि ट्रान्स्फॉर्मर बसवण्याची मागणी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी जागा हस्तांतरण आणि वीजजोडण्या सुकर करण्याचे आश्वासन दिले.

‘महावितरण’समोर उद्योजकांचा अडचणींचा पाढा
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

नाशिक इंडस्ट्रीज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (निमा) कार्यालयात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधा व उद्योजकांच्या प्रश्नांबाबत बैठक झाली. उद्योजकांनी सिन्नरच्या वीजपुरवठ्याबाबत अडचणींचा पाढा वाचला, तर अधिकाऱ्यांनी त्यांच्या निराकरणाची ग्वाही दिली.

‘महावितरण’चे अधीक्षक अभियंता राजेश थूल, कार्यकारी अभियंता अनिल झटकरे, औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील, ‘निमा’चे अध्यक्ष आशिष नहार, उपाध्यक्ष किशोर राठी, मनीष रावल, सचिव राजेंद्र अहिरे, राजेंद्र वडनेरे, किरण पाटील, ऊर्जा समितीचे अध्यक्ष मिलिंद राजपूत, प्रवीण वाबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. नहार यांनी सिन्नर औद्योगिक वसाहतीत नवीन वीजजोडण्या, वाढीव वीजभार मंजुरीस येणाऱ्या अडचणींची माहिती दिली. मंजूर नवीन उपकेंद्राच्या उभारणीला गती देणे व उपकेंद्रामध्ये वाढीव क्षमतेचे ट्रान्स्फॉर्मर बसवण्याची मागणी केली. सिन्नरच्या माळेगाव औद्योगिक वसाहतीतील तिन्ही उपकेंद्रे पूर्ण क्षमतेने सुरू असल्याने वाढीव भार मंजूर करणे कठीण होत आहे, असे सांगण्यात आले. त्यावर मंजूर उपकेंद्रासाठी जागा हस्तांतरणाची प्रक्रिया मार्गी लावण्याचे आश्वासन दीपक पाटील यांनी दिले. औद्योगिक क्षेत्रातील उपकेंद्रांमध्ये पाच व दहा मेगावॉटचे ट्रान्स्फॉर्मर बसवून नवीन वीज जोडण्या सुकर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.