महापालिका कर्मचाऱ्यांना ‘आश्रय’

महाराष्ट्र टाइम्स

मुंबई महापालिकेकडून सफाई कामगारांसाठी 'आश्रय' योजना राबवली जात आहे. कुलाबा कोचीन स्ट्रीटवर घरे बांधली जाणार आहेत. मुंबई बंदर प्राधिकरणाने या प्रकल्पाला तत्त्वतः मंजुरी दिली आहे. १७ कोटी रुपयांच्या या योजनेतील महत्त्वाचा अडथळा दूर झाला आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये भूमिपूजन झालेल्या या प्रकल्पाला आता गती मिळणार आहे. यामुळे महापालिका कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

महापालिका कर्मचाऱ्यांना ‘आश्रय’
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

मुंबई महापालिकेकडून सफाई कामगारांसाठी आश्रय योजनेअंतर्गत घरे बांधण्यात येत आहेत. यासाठी कुलाबा कोचीन स्ट्रीटवर घरे उपलब्ध करण्यात येणार असून मुंबई बंदर प्राधिकरणाने (बीपीटी) या गृहनिर्माण प्रकल्पाला तत्त्वतः मंजुरी दिली. १७ कोटी रुपयांच्या या योजनेतील महत्त्वाचा अडथळा दूर झाला आहे.

फोर्टमधील कोचीन स्ट्रीट येथे असलेल्या या प्रकल्पाचे ऑक्टोबर २०२४मध्ये भूमिपूजन करण्यात आले होते. प्रत्येकी २३८ चौरस फूट योजनेत ५४ घरे आहेत. या आधीच ना हरकत प्रमाणपत्राअभावी प्रकल्पाला विलंब झाला आहे. त्यामुळे गती देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमन २०३४अंतर्गत या प्रकल्पाला परवानगी देण्याची विनंती बीपीटीला केली होती.

या पत्रात त्या जमिनीचा काही भाग बीपीटीचा असल्याने त्यासाठी लवकर परवानगी देण्यात यावी. तसे ७ ऑक्टोबर २०२५च्या पत्राद्वारे, पोर्ट ट्रस्टच्या जमिनीवर परवानगी असलेले बांधकाम क्षेत्र ८७३.२३ चौरस मीटर असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले होते. ऑगस्ट आणि ऑक्टोबर २०२५मध्ये नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनीही महापालिका आयुक्त भूषण गगराणी, तसेच मुंबई बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. एम. अंगमुथू यांना पत्र लिहून आवश्यक मंजुरी लवकर देण्याची मागणी केली होती. अखेर त्याला मंजुरी मिळाली असून महापालिका कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.