त्र्यंबक नगर परिषद अंतर्गत १६६ कोटी रुपयांच्या सिंहस्थ कामांना सुरुवात झाली आहे. साधरणतः महिनाभरापूर्वी जुना आखाड्याच्या पिंपळद येथील जमिनवर कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भूमिपूजन झाले होते. त्यानंतर गत आठवड्यात कुशावर्त तीर्थावर मान्यवरांच्या हस्ते पुन्हा भूमिपूजन झाले. मात्र, विकासकामांना वेग येत नसल्याचे लक्षात घेत नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांनी साधू आखाड्यांना भेटी देऊन प्रत्यक्ष कामाला गती मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले.
येथील बडा उदासीन आखाड्यात भेट दिली असता आखाड्याचे अध्यक्ष श्री महंत दुर्गादास महाराज, श्री महंत रामनवमीदास महाराज, सचिव हंसमुनी महाराज, मुकामी महंत दानमुनी यांसह साधू-महंतांनी सिंहस्थ कालावधीसाठी बांधण्यात येणाऱ्या स्वयंपाकघराच्या जागेवर जाऊन पाहणी केली. यावेळी नगराध्यक्षा तुंगार, माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे, मंदिर ट्रस्टचे विश्वस्त प्रदीप तुंगार उपस्थित होते.
आखाड्यातील विकासकामांसाठी जागेची निश्चिती केल्यानंतर आखाड्याच्या वतीने तुंगार यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये आखाड्यात करावयाच्या कामाची माहिती देण्यात आली असून, ती कामे नगरपरिषद अंतर्गत करावीत, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभाग, पायाभूत सुविधा विकास महांडळ अथवा तत्सम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क होत नाही. त्याचा परिणाम गुणवत्तापूर्ण काम होत नाही, असे साधू-महंतांचे म्हणणे आहे.
आखाड्यामध्ये २५ वॉशरूम आणि २५ लॅट्रीन, २० अटॅच रूम, यापूर्वीचे वॉशरूम व लॅट्रीन दुरूस्त करणे, स्ट्रीट लाइट लावणे आणि वाकलेले खांब दुरूस्त करणे, दररोज पिण्याचे व वापराचे पाणी नळाला उपलब्ध करून देणे, पूर्वीचे काँक्रिटीकरण नव्याने करणे यासह आणखी काही मागण्या आखाड्यांच्या वतीने करण्यात आल्या आहेत.







