Jnu Students Vote On Removing Vice Chancellor Major News Including Terrorist Attack And Cbi Summons
कुलगुरू हटविण्यासाठी‘जेएनयू’मध्ये मतकौल
महाराष्ट्र टाइम्स•
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कुलगुरूंच्या विरोधात विद्यार्थ्यांचे मतकौल घेण्यात आले. राजौरी सेक्टरमध्ये लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला, ज्यात एक दहशतवादी मारला गेला. करूर चेंगराचेंगरी प्रकरणी विजय यांना सीबीआयने १५ मार्च रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. गोवा विधानसभेत एका आमदाराने आंदोलनाबद्दल माफी मागितली. जम्मू-काश्मीरमध्ये देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग असलेल्या तीन कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. तेलंगणात सायबर फसवणुकीप्रकरणी २०० जणांना अटक झाली आहे.
नवी दिल्ली: जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या ( JNU ) विद्यार्थी संघटनेने कुलगुरू संतीश्री धुलिपदी पंडित यांना पदावरून हटवावे की नाही, यावर विद्यार्थ्यांचे मत जाणून घेण्यासाठी मतदान घेतले. या मतदानात 'होय' किंवा 'नाही' असे पर्याय होते. जेएनयू शिक्षक संघटनेच्या माजी सदस्यांच्या देखरेखेखाली ही प्रक्रिया पार पडली. या संदर्भात पंडित यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. नौशेरा सेक्टरमधील झांगर परिसरात सुरक्षा दलांना दोन दहशतवादी दिसले. जवानांनी तातडीने कारवाई करत एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले.करूर चेंगराचेंगरी प्रकरणी ‘सीबीआय’ने अभिनेता विजय यांना १५ मार्च रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. यापूर्वी जानेवारीत त्यांची दोनदा चौकशी झाली होती. ९ मार्च रोजी पुन्हा समन्स बजावले होते, मात्र विधानसभा निवडणुकीच्या कामामुळे व्यग्र असल्याचे कारण देत विजय यांनी चौकशी १५ दिवसांसाठी पुढे ढकलण्याची विनंती केली होती.
गोवा विधानसभेच्या दर्शक गॅलरीत काही व्यक्तींनी केलेल्या आंदोलनाबद्दल गोवा फॉरवर्ड पार्टीचे आमदार विजय सरदेसाई यांनी सभागृहात माफी मागितली. या आंदोलनकर्त्यांना त्यांच्या कार्यालयातून प्रवेशासाठीचे पास देण्यात आले होते.
जम्मू-काश्मीर सरकारने जलशक्ती विभागातील तीन कर्मचाऱ्यांना देशविरोधी आणि विध्वंसक कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या आरोपावरून सेवेतून बडतर्फ केले आहे. या तिघांवर दहशतवादी कृत्यांमध्ये सहभाग, कट रचणे, दहशतवाद्यांना आश्रय देणे आणि दहशतवादी संघटनेचे सदस्यत्व किंवा समर्थन केल्याचा आरोप आहे.
तेलंगणा राज्य सायबर सुरक्षा विभागाने देशभरात सायबर फसवणुकीला प्रोत्साहन देणाऱ्या बनावट खात्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत २०८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये दोन बँक कर्मचारी, सॉफ्टवेअर अभियंते, सात विद्यार्थी आणि १५ महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, अटक झालेल्या बँक कर्मचाऱ्यांमध्ये ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या एका कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. या प्रकरणात दीड हजारांहून अधिक गुन्हे नोंदवण्यात आले असून, ६२६ संशयितांची ओळख पटवण्यात आली आहे.