चैत्रोत्सवात आपत्ती नियंत्रणासाठी शंभर कर्मचारी

महाराष्ट्र टाइम्स

श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर होणाऱ्या चैत्रोत्सवासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. आपत्ती नियंत्रणासाठी १०० कर्मचारी सज्ज असतील. लाखो भाविकांच्या सुरक्षेसाठी कायदा, सुव्यवस्था, स्वच्छता आणि आरोग्य सुविधांचे नियोजन केले आहे. वाहतुकीसाठी एसटी महामंडळाकडून ३०० जादा बस धावतील. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे संपूर्ण परिसरावर नजर ठेवली जाईल. ट्रस्टतर्फे मोफत अन्नदान आणि पिण्याच्या पाण्याची सोय केली जाईल.

चैत्रोत्सवात आपत्ती नियंत्रणासाठी शंभर कर्मचारी
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावरील चैत्रोत्सवातील आपत्ती नियंत्रणासाठी प्रशासनाने १०० स्वतंत्र कर्मचाऱ्यांची टीम कार्यरत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यात्रोत्सवाचे नियोजन पूर्ण झाले असून, मंगळवारी (दि. १०) कळवणच्या सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. कश्मिरा संखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यात्रोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

दि. २६ मार्च ते २ एप्रिल २०२६ दरम्यान होणाऱ्या चैत्रोत्सव यात्रेत लाखो भाविक गडावर दाखल होणार असल्याने कायदा व सुव्यवस्था, सुरक्षा, स्वच्छता, वाहतूक आणि आरोग्य सुविधांचे काटेकोर नियोजन करण्यात आले. यात्रेच्या काळात भाविकांच्या सोयीसाठी शिवालय परिसरात नेहमीप्रमाणे मोठ्या मंडपाची व्यवस्था विश्वस्त संस्थेच्या वतीने करण्यात येणार असून, मोबाइल टॉयलेट, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि स्वच्छतेसाठी विशेष कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.

आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथकाचे सुमारे १०० कर्मचारी सज्ज ठेवण्यात येणार आहेत. तसेच अनिरुद्ध ॲकॅडमीचे जवळपास २०० स्वयंसेवकही यात्रेच्या व्यवस्थापनासाठी कार्यरत राहणार आहेत. मंदिर परिसरात सुरक्षेसाठी तब्बल ३११ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत ठेवण्यात येणार असून, संपूर्ण परिसरावर नियंत्रण ठेवले जाणार आहे.

बैठकीस कळवणचे तहसीलदार रोहिदास वारुळे, श्री सप्तश्रृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त ॲड. ललित निकम, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, अधीक्षक प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, सरपंच रमेश पवार, उपसरपंच संदीप बेनके, ग्रामसेवक संजय देवरे, सदस्य राजेश गवळी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजय दुबे व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

यात्रेदरम्यान वाहतूक व्यवस्थेसाठी एसटी महामंडळाकडून विशेष ३०० जादा बसचे नियोजन करण्यात येणार असून, घाटमार्गात आणि सप्तशृंगगडावर अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. श्री सप्तश्रृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी मोफत अन्नदानाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच सप्तशृंगगड परिसरात व विविध मार्गांवर पिण्याच्या पाण्याची ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाकडून उपविभागीय पोलिस अधिकारी, निरीक्षक तसेच मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. गर्दी नियंत्रणासाठी बॅरिकेडिंगची व्यवस्था, ट्रस्टच्या वतीने सिजफायर (आपत्कालीन नियंत्रण) यंत्रणा तसेच अग्निशमन दलाची गाडीही सज्ज ठेवण्यात येणार आहे.