पवनी तालुक्यातील वडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने विद्यार्थिनींना मोबाइलवर पॉर्न फिल्म दाखवून अश्लील चाळे केले. खिचडी बनविणाऱ्या महिलेने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर संतापाची लाट उसळली. त्यानंतर गावकऱ्यांनी शिक्षकाला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.
अनिल जगन राऊत (५४) असे शिक्षकाचे नाव असून तो लाखांदूर येथील साईनाथ वसाहतीत वास्तव्यास आहे. पवनी तालुक्यातील वडेगाव येथील जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकी शाळेत तो कार्यरत आहे. शाळेत रुजू झाल्यापासूनच तो इयत्ता तिसरी आणि चौथ्या वर्गातील मुलींशी अश्लिल चाळे करीत असे. मुलींना घरी सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत होता. भीतीपोटी आजतागत मुलींनी सदर बाब पालकांना सांगितली नव्हती. मात्र सोमवारी, ९ मार्चला चिमुकल्यांना शिक्षकाचा हा त्रास सहन न झाल्याने शाळेतील खिचडी शिजविणाऱ्या महिलेकडे घडलेला प्रकार सांगितला. खिचडी शिकविणाऱ्या महिलेने घडलेला घृणास्पद प्रकार चिमुकल्यांच्या आईवडिलांना सांगितला. सदर प्रकार ऐकून सुन्न झालेल्या आईवडिलांनी गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तींना घेऊन लगेच पोलिस पाटील यांच्या निदर्शनास सदर प्रकरण आणून दिला.
गावकरी व पोलिस पाटलांनी मंगळवारी शाळेत जाऊन चौकशी केली असता शिक्षकाने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यानंतर गावकऱ्यांनी शिक्षकाला चोप दिला. पोलिस पाटील यांनी लागलीच पोलिसांना फोन करून घडलेला प्रकार सांगताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. या घटनेमुळे सर्वस्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.
सदर शिक्षकाने यापूर्वी लाखांदूर येथे कार्यरत असताना शाळेत एका १२ वर्षीय मुलीशी असेच चाळे केल्यामुळे २०१८मध्ये त्याने तीन वर्षे कारागृहात घालविले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक निलेश ब्राम्हणे यांनी दिली. आरोपीला अटक करून बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी शिक्षकाला कठोर शिक्षा देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली. सदर प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मनोज सिडाम, पोलिस निरीक्षक निलेश ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक यशोदा पाटील करीत आहेत.







