Incident Of 10th Grade Math Paper Leak Police Investigation Underway
दहावीचे गणिताचे पेपर फुटले
महाराष्ट्र टाइम्स•
दहावीच्या गणिताच्या प्रश्नपत्रिका परीक्षांआधीच एका ग्रुपवर उपलब्ध झाल्याचे उघड झाले आहे. भाग-१ ची प्रश्नपत्रिका ५ मार्च रोजी रात्री ८ वाजून ३७ मिनिटांनी तर भाग-२ ची प्रश्नपत्रिका ६ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजून ५६ मिनिटांनी ग्रुपवर टाकण्यात आली होती. या प्रश्नपत्रिका आणि प्रत्यक्ष परीक्षांमधील प्रश्नपत्रिका जुळल्याने शिक्षण मंडळाने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
शिक्षण मंडळाच्या परीक्षांचे पेपर फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘गणित भाग-१’ आणि ‘गणित भाग-२’ च्या प्रश्नपत्रिका परीक्षांच्या आधीच एका व्हॉट्सॲप ग्रुपवर उपलब्ध होत्या. या प्रकरणी शिक्षण मंडळाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, प्रश्नपत्रिका नेमक्या कुठून बाहेर गेल्या याचा तपास पोलीस करत आहेत. ‘विज्ञान-१’ आणि ‘विज्ञान-२’ च्या प्रश्नपत्रिकाही अशाच प्रकारे विकल्या जात असल्याचा संशय आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘गणित भाग-१’ च्या प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र ५ मार्च रोजी रात्री ८ वाजून ३७ मिनिटांनी एका व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकण्यात आले होते. विशेष म्हणजे, ९ मार्च रोजी झालेल्या ‘गणित भाग-२’ च्या प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र तर तब्बल तीन दिवस आधी, म्हणजे ६ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजून ५६ मिनिटांनी त्याच ग्रुपवर उपलब्ध होते. शिक्षण मंडळाने अधिकृत प्रश्नपत्रिका आणि ग्रुपवर आलेल्या प्रश्नपत्रिकांची पडताळणी केली असता, त्या दोन्ही एकसारख्या असल्याचे स्पष्ट झाले. या गंभीर प्रकारामुळे शिक्षण मंडळाने तातडीने पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.या व्हॉट्सॲप ग्रुपवर केवळ प्रश्नपत्रिका शेअर केल्या जात नव्हत्या, तर त्या मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना पैसे देण्यास प्रवृत्त करणारे संदेशही पोस्ट केले जात होते. ९ मार्च रोजी सायंकाळी ‘विज्ञान-१’ व ‘विज्ञान-२’ च्या प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा संदेश ग्रुपवर आला होता. त्यासाठी एका विशिष्ट आयडीवर संपर्क साधण्यासही सांगण्यात आले होते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामागे एक मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी पोलीस कसून तपास करत आहेत. प्रश्नपत्रिका कोणत्या स्तरावरून बाहेर गेल्या, याचा शोध पोलीस घेत आहेत.