मुंबईचे तापमान४० अंशांवर

महाराष्ट्र टाइम्स

मुंबईत मंगळवारी उष्णतेचा तडाखा बसला. सांताक्रूझ येथे ४० अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. हे गेल्या दहा वर्षांतील चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक तापमान होते. डहाणू येथेही ४० अंश तापमान होते. ठाणे येथे ३९.२ अंश तापमान होते. उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट जाणवली. बुधवारीही उष्ण वातावरण राहण्याची शक्यता आहे.

मुंबईचे तापमान४० अंशांवर
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

समुद्रावरून येणारे वारे प्रत्यावर्ती चक्रीय वातस्थितीमुळे अडल्याने मुंबईमध्ये मंगळवारी उष्णतेचा कहर झाला होता. सांताक्रूझ येथे सन २०२१नंतरचे सर्वाधिक, तर गेल्या दहा वर्षांतले चौथ्या क्रमांकाचे कमाल तापमान नोंदले गेले. सांताक्रूझ येथे कमाल तापमानाचा पारा ४० अंशांपर्यंत चढला होता. आज, बुधवारीही उत्तर कोकण विभागात तुरळक ठिकाणी उष्ण वातावरण जाणवू शकेल, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाने दिली.

मुंबईमध्ये सांताक्रूझ येथे सरासरीपेक्षा कमाल तापमान ७.६ अंशांनी, डहाणू येथे ९.६ अंशांनी, तर ठाणे येथे ५.४ अंशांनी अधिक होते. डहाणू येथेही मंगळवारी ४० अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली, तर ठाणे येथे ३९.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. मुंबईत तुरळक ठिकाणी कमाल तापमान ४० अंशांपलीकडे पोहोचले होते. राम मंदिर येथे स्वयंचलित केंद्रावर ४२.४, विक्रोळी येथे ४१.६, भायखळा येथे ४० अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. सकाळच्या वेळेत मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला, मात्र ११नंतर उष्ण झळांचे प्रमाण अधिक जाणवले.

कोकण विभागात सर्वदूर मंगळवारी कमाल तापमान सरासरीपेक्षा मोठ्या फरकाने अधिक होते. उत्तर कोकणामध्ये तुरळक ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट जाणवली. विदर्भात अकोला येथे ४०.७, अमरावती येथे ३९.८, ब्रह्मपुरी येथे (पान १२वर)