ढाब्यावरील कर्मचाऱ्याच्या खुनाची घटना आठ महिन्यांनंतर उघडकीस आली. याप्रकरणी रामटेक पोलिसांनी मालकासह पाच जणांना अटक केली. प्रतापसिंग महादेवसिंग बैस (वय ५०, मूळ रा. मुंबई), असे मृताचे तर पीयूष कैलास ठाकरे (वय २३), त्याचे वडील कैलास माणिकराव ठाकरे (वय ५३, दोघेही रा. नवरगाव), शिवराम पोतन मरकाम (वय ५०), धर्मराज ताराचंद वरठी (वय ४५, रा. आमगाव) व धीरज धनराज वानखेडे (वय ३७, रा. नवरगाव), अशी अटकेतील मारेकऱ्यांची नावे आहेत.
पीयूष याचा रामटेक-तुमसर मार्गावर ‘टुरिस्ट ढाबा’ आहे. येथे प्रतापसिंग हा काम करायचा. त्याला दारूचे व्यसन होते. आठ महिन्यांपूर्वी ढाब्यावरून मोबाइल चोरी केला. पीयूषने त्याच्यावर चोरीचा आरोप केला. त्यामुळे प्रतापसिंग याने त्याला शिवीगाळ केली. त्यानंतर तो दोरीला फास बांधून आत्महत्येच्या प्रयत्नात होता. पीयूषला फास दिसला. शिवीगाळ केल्याने तो संतापला होताच. रागाच्या भरात त्याने प्रतापसिंगच्या गळ्यात फास टाकून त्याचा खून केला. वडील व अन्य साथीदारांच्या मदतीने त्याचा मृतदेह ढाब्यामागील शेतात पुरला. ढाब्यावरून प्रतापसिंग बेपत्ता झाल्याने गावात चर्चा सुरू झाली होती.







