पीयूष मिश्रा यांची मैफल ठाण्यात रंगणार

महाराष्ट्र टाइम्स

येत्या शनिवारी ठाण्यात पीयूष मिश्रा यांच्या कविता आणि गाण्यांची मैफल आयोजित केली आहे. १४ मार्च रोजी टीएमसी ग्राऊंडवर संध्याकाळी ७ वाजता 'आरंभ २.०' हा कार्यक्रम होणार आहे. रोजच्या जगण्यातील प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या मैफलीतून केला जाईल. मिश्रा यांच्या अनोख्या सादरीकरणाची जादू प्रेक्षकांना अनुभवता येईल. तिकीटविक्री सुरू झाली आहे.

पीयूष मिश्रा यांची मैफल ठाण्यात रंगणार
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

‘जिस कवि की कल्पना में ज़िंदगी हो प्रेमगीत, उस कवि को आज तुम नकार दो,’ असे ठणकावून सांगणाऱ्या, ‘हम चाँद पे, रोटी की चादर डाल के सो जाएँगे... और नींद से कह देंगे लोरी कल सुनाने आएँगे,’ असे म्हणणाऱ्या, ‘कहते हैं जिसको, दुजा मुल्क उस पाकिस्तां में पहुँचे..’ असे म्हणत सीमेपार घेऊन जाणाऱ्या पीयूष मिश्रा नावाच्या अवलियाचा अस्वस्थ आवाज येत्या शनिवारी ठाण्यात घुमणार आहे. शनिवार, १४ मार्चला ‘ आरंभ २.० ’ ही पीयूष मिश्रा यांच्या कविता व गाण्यांची मैफल हिरानंदानी येथील टीएमसी ग्राऊंडवर संध्याकाळी ७ वाजल्यापासून रंगेल. अवघ्या तीन दिवसांवर आलेल्या या मैफलीची तिकीटविक्री सुरू झाली असून सोबत दिलेल्या क्यूआर कोडवरून वाचक तिकीट काढू शकतात.

‘रोजच्या जगण्यातले अनेक प्रश्न आपल्याला अस्वस्थ करतात. त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न, धडपड शब्दसूरांच्या आणि गीतांच्या माध्यमातून सुरू असते. ही धडपड म्हणजेच ‘आरंभ २.०’ आहे,’ असे पीयूष मिश्रा म्हणाले. त्यांची गाणी सादर करण्याची पद्धत अनोखी आहे. ‘एक बगल में चांद होगा’, ‘हुस्ना’, ‘आरंभ है प्रचंड’ या प्रत्येक कवितेला सूरांचा साज लाभला आणि त्याला पीयूष मिश्रा यांच्या आवाजाची जोड मिळाली की, हे शब्द जिवंत होतात. त्यामुळे प्रेक्षकही तल्लीन होऊन ऐकत राहतात. डोळ्यांनी हा गीतकार उपस्थितांशी बोलतो, आपल्या मनातील हितगूज देहबोलीतून, स्वरांच्या फेकीतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो.

‘मी या कार्यक्रमात गाण्यांच्या मध्ये-मध्ये लोकांशी संवाद साधतो. कदाचित ते लोकांना आवडत असावे. तसेच, गाण्यांची निवड अत्यंत महत्त्वाची आहे. या पिढीच्या भावभावनांना हात घालणारी गाणी असल्याने ती सहजच या तरुणांच्या तोंडी रूळतात’, असे मिश्रा म्हणाले. आपले संगीत म्हणजे ‘मॉडर्न थिएटर म्युझिक’ असल्याचे ते आवर्जून सांगतात. या रंगमंचीय संगीताची जादू अनुभवण्याची संधी ठाण्यातील प्रेक्षकांना ‘आरंभ २.०’च्या निमित्ताने मिळणार आहे.