राष्ट्रसंतांचे विचार जगाला तारक

महाराष्ट्र टाइम्स

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार जगाला तारू शकतात. नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन व विचारधारा विभागाने आयोजित केलेल्या सहाव्या साहित्य संमेलनात हे विचार मांडण्यात आले. या संमेलनात राष्ट्रनिर्माण आणि युवकांकडून अपेक्षा यावर परिसंवाद झाला. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून राष्ट्रसंतांच्या साहित्याचा अभ्यास करावा, असे आवाहन करण्यात आले. संमेलनादरम्यान रक्तदान शिबिर आणि कॅन्सर तपासणीही करण्यात आली.

राष्ट्रसंतांचे विचार जगाला तारक
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

जगात भीषणमहायुद्धाची परिस्थिती सुरू असताना माणूस म्हणून जगण्याची शक्ती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे साहित्य देते. त्यांचे विचारच जगाला तारू शकतात, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ . श. नु. पठाण यांनी केले. विद्यापीठाच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन व विचारधारा विभागाच्यावतीने आयोजित ‘सहाव्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलना’च्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.

औषधीनिर्माणशास्त्र विभागाच्या डॉ. ए. के. डोरले सभागृहात आयोजित समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी कुलगुरू डॉ. पठाण, राष्ट्रधर्म प्रचार समितीचे आजीवन प्रचारक आचार्य हरिभाऊ वेरुळकर, संमेलनाध्यक्ष डॉ.अक्षयकुमार काळे, अध्यासन प्रमुख डॉ. विजयालक्ष्मी थोटे यांची उपस्थिती होती. ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची आज जगाला सर्वतोपरी आवश्यकता असून ते विचार सर्वांनी आत्मसात करावेत’, असेही डॉ. पठाण पुढे बोलताना म्हणाले. आचार्य वेरूळकर यांनी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याने समाजाची जडणघडण झाली आहे. आजच्या युवा पिढीने ही घडण स्वीकारली पाहिजे आणि त्यातूनच त्यांचे जीवन सुंदर बनू शकते, असे विचार मांडले.

संमेलनात ‘राष्ट्रनिर्माण आणि राष्ट्रसंतांची भूमिका व युवकांकडून अपेक्षा’ या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी अमरावती येथील मराठी भाषा विद्यापीठातील अधिष्ठाता डॉ. कोमल ठाकरे होते. वक्ते म्हणून डॉ. अरविंद देशमुख आणि अरविंद राठोड यांची उपस्थिती होती. राष्ट्रसंताना अपेक्षित राष्ट्र मानवाच्या नैतिकतेतून निर्माण होऊ शकते, असे विचार डॉ. देशमुख यांनी व्यक्त केले. राठोड यांनी, तुकडोजी महाराजांना सत्य-शील यांचे पाचारण करणारा आणि नेहमीच उद्योगी राहणारा युवक अपेक्षित होता, असे सांगितले.

परिसंवादाचे अध्यक्ष डॉ. ठाकरे यांनी, राष्ट्रसंतांच्या नैतिक मूल्यांचा विचार आपल्या भाषणातून मांडला. युवकांनी व्यसनाकडे न वळता राष्ट्रसंतांच्या साहित्याचा अभ्यास करून स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणावे, असे ते म्हणाले. समारोपीय सत्राचे सूत्रसंचालन प्रा. वर्षा पाटील यांनी केले, तर आभार डॉ. देवमन कामडी यांनी मानले.

या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अध्यासनात कॅन्सरची प्राथमिक तपासणी एचसीजी कॅन्सर सेंटरने केली. साईनाथ ब्लड बँकेच्या मदतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. संमेलनाकरिता विचारधारा विभागाचे आजी-माजी विद्यार्थी, गुरुदेवप्रेमी आणि महाराजांचे साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.