एआयमुळे एफआयआर अवघ्या चार मिनिटांत

महाराष्ट्र टाइम्स

पोलिसांच्या कामात एआयमुळे क्रांती घडली आहे. आता एफआयआर अवघ्या चार मिनिटांत नोंदवला जात आहे. नंदनवन पोलिसांनी सुरू केलेला हा उपक्रम आता परिमंडळ चारमधील सर्व सहा पोलीस ठाण्यांमध्ये राबवला जात आहे. यामुळे तक्रारदार आणि पोलीस दोघांचाही वेळ वाचत आहे. प्रशासकीय कामांसाठीही एआयचा वापर होत आहे. या नव्या प्रणालीमुळे कामात सुलभता आली आहे.

fir registered in just four minutes with the help of ai

तक्रारदार पोलिस ठाण्यात गेला की त्याला तक्रार नोंदविण्यासाठी तासंतास लागतात. त्यामुळे तक्रारदारासह पोलिसांचाही वेळ वाया जातो. नेमकी हीच बाब ओळखून पोलिस उपायुक्त रश्मिता राव यांच्या मार्गदर्शनाखाली नंदनवन पोलिसांनी आता एआयच्या मदतीने काही घटनांचा प्रथम खबरी अहवाल (एफआयआर) नोंदविण्यास सुरुवात केली आहे.

या यशस्वी उपक्रमामुळे आता पोलिसांना अवघ्या चार मिनिटांत एफआयआर व मिसिंग नोंदण्यात यश मिळाले आहे. नंदनवन पोलिसांनी सुरू केलेला हा उपक्रम परिमंडळ चारमधील सर्वच सहा ठाण्यांमध्ये राबविण्यात येत आहे. आधी या प्रक्रियेला ३० मिनिटे ते एक तासाचा अवधी लागायचा.कोणत्याही अतिरिक्त साधनांशिवाय पोलिस ठाण्यात उपलब्ध कम्प्युटर, एआय प्रणाली, व्हॉइस टायपिंग आदींचा वापर करून ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. तक्रार दाखल करण्यासह अटकेची नोंद, वैद्यकीय अहवाल पाठविणे व दैनंदिन हजेरीसह प्रशासकीय कामांसाठी याचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे वेळ वाचत आहे. नंदनवन पोलिसांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचे उपायुक्त राव यांनी कौतुक करीत हा उपक्रम नंदनवनसह सक्करदरा, इमामवाडा, हुडकेश्वर, अजनी व बेलतरोडी पोलिस ठाण्यात लागू करण्यात आला आहे. या सहा पोलिस ठाण्यातील १६५ महिला कर्मचाऱ्यांना याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. अदखलपात्र गुन्हा, मोबाइल अथवा अन्य वस्तू हरविल्याची नोंद, चोरी आदींची सीसीटीएनएस प्रणालीद्वारे नोंद करण्यास बराच वेळ लागायचा. तक्रारीच्या प्रती काढण्याची प्रक्रियाही वेळखाऊ होती. एआयच्या वापराद्वारे या नव्या प्रणालीमुळे आता ही प्रक्रिया सुलभ झाली आहे, अशी माहिती नंदनवन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास देशमाने यांनी दिली.