वानाडोंगरीत मेट्रोचे ‘सेगमेंट’ खाली पडले

महाराष्ट्र टाइम्स

वानाडोंगरी येथे मेट्रोचे काम सुरू असताना एक सेगमेंट खाली पडला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुरक्षा नियमांचे पालन झाले होते. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला. या घटनेची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे. दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल.

वानाडोंगरीत मेट्रोचे ‘सेगमेंट’ खाली पडले
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

सुरक्षेचा नियमांचे पालन झाले असले तरी अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. यासाठी तीनसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. महामेट्रोचे अधिकारी, सल्लागार आणि सुरक्षा प्रमुखांचा यात समावेश असेल. ३१ मीटरचा एक स्पॅन असतो. यात ११ सेगमेंट असतात. यातील एक सेगमेंट खाली पडला. चौकशीत कुणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे महामेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

महामेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील कामादरम्यान वानाडोंगरी येथे शुक्रवारी रात्री नियमित सेगमेंट उभारणीच्या प्रक्रियेत एक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे हा सेगमेंट खाली पडला. सुदैवाने जीवितहानी टळली. या घटनेमुळे खळबळ उडाली.

हा प्रकार कंत्राटदार कंपनी कल्पतरू यांच्याकडून रिच-३ए येथे काम सुरू असताना घडल्याची माहिती महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सुमारे ११.१५ वाजता एस-४/४ हा सेगमेंट यशस्वीरित्या उचलण्यात आला. त्यानंतर पुढील एस-२/१० सेगमेंट उचलताना शुक्रवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास लाँचिंग गर्डरच्या डाव्या बाजूच्या विंचमध्ये तांत्रिक बिघाड झाला. यावेळी यंत्रणेत बसविण्यात आलेली सुरक्षा इशारा प्रणाली तत्काळ सक्रिय झाली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या कंत्राटदाराच्या यांत्रिक पथकाने तत्काळ मान्य कार्यपद्धतीनुसार आवश्यक दुरुस्तीची प्रक्रिया सुरू केली. सेगमेंट सुरक्षितरीत्या बंदिस्त परिसरात स्थिर करण्यात आला आणि प्रशिक्षित अभियंत्यांनी सुमारे सहा मीटर उंचीवरून तो नियंत्रित पद्धतीने खाली उतरविण्याची प्रक्रिया सुरू केली. सेगमेंट जमिनीपासून सुमारे दोन मीटर उंचीवर असताना डाव्या बाजूच्या विंचची वायर दोरी तुटली आणि सेगमेंट मर्यादित उंचीवरून खाली पडला.

महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, कडक सुरक्षा नियमांनुसार लटकविलेल्या भाराखाली कोणताही कर्मचारी उपस्थित नव्हता. त्यामुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुरक्षा यंत्रणा वेळेवर सक्रिय झाल्याने आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनी तत्पर प्रतिसाद दिल्याने मोठी दुर्घटना टळली.