ठाणे जिल्ह्यातील २१ जिल्हा परिषद शाळांच्या ऑनलाइन संचमान्यतेतील तांत्रिक त्रुटींमुळे निर्माण झालेल्या समस्येवर शासनाने तातडीने पावले उचलली आहेत. संबंधित शाळांना संचमान्यतेत दुरुस्ती करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आल्याने पटसंख्येनुसार, शिक्षक पदे मंजूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शहापूर, मुरबाड, कल्याण आणि अंबरनाथ या तालुक्यांतील २१ शाळांच्या ऑनलाइन संचमान्यतेत तांत्रिक चुका आढळून आल्या होत्या. या त्रुटींमुळे शिक्षकांच्या पदांबाबत गोंधळ निर्माण होण्याची शक्यता होती. काही शाळांमध्ये प्रत्यक्ष पटसंख्या असतानाही शिक्षकांची संख्या कमी दाखवली जाण्याची भीती व्यक्त केली जात होती. परिणामी शिक्षक पदे अतिरिक्त ठरणे किंवा रिक्त राहणे, तसेच शिक्षक भरती प्रक्रियेत अडथळे निर्माण होण्याची शक्यता होती.
यासंदर्भात ‘ महाराष्ट्र टाइम्स ’मध्ये ‘ संचमान्यता त्रुटी दूर करा’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनीही या प्रकरणात पुढाकार घेत शासनाकडे तातडीने दखल घेण्याची मागणी केली. याची दखल घेत शासनाने संबंधित २१ शाळांना संचमान्यतेत दुरुस्ती करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे शाळांना पुन्हा ऑनलाइन संचमान्यता जनरेट करण्याची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’मधील वृत्त आणि खासदार सुरेश म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाने विद्यार्थी हित लक्षात घेऊन संचमान्यता त्रुटी दुरुस्तीस हिरवा कंदील दिला आहे, असे नारायणगाव (ता. शहापूर) येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश शिर्के यांनी सांगितले.








