‘हा आदिवासींचा अवमान’

महाराष्ट्र टाइम्स

पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अपमान केल्याचा आरोप केला. राष्ट्रपतींच्या स्वागताला मुख्यमंत्री किंवा मंत्री उपस्थित नव्हते. कार्यक्रमाचे नियोजनही योग्य नव्हते. मोदींनी याला आदिवासी आणि राज्यघटनेचा अवमान म्हटले. राज्यात १८,६८० कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटनही करण्यात आले. या प्रकल्पांमुळे पूर्व भारताला नवी गती मिळेल.

‘हा आदिवासींचा अवमान’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या दौऱ्यात तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीका केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना उत्तर बंगाल दौऱ्यादरम्यान झालेल्या गैरसोयीवरून मोदींनी तृणमूलवर निशाणा साधला. राष्ट्रपतींचा अपमान करून तृणमूलने आदिवासी , राज्यघटना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही अवमान केल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय, घुसखोरांना वाचवण्यासाठी तृणमूल मतदार याद्यांच्या पडताळणीला विरोध करत असल्याचा दावाही मोदींनी केला. या दौऱ्यात त्यांनी १८,६८० कोटी रुपयांच्या दळणवळण प्रकल्पांचे उद्घाटन केले.

पश्चिम बंगालमधील ब्रिगेड परेड ग्राउंड येथे झालेल्या सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी तृणमूल काँग्रेसवर कडाडून टीका केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उत्तर बंगाल दौऱ्यादरम्यान त्यांना झालेल्या गैरसोयीवरून त्यांनी तृणमूल सरकारला लक्ष्य केले. राष्ट्रपतींना कार्यक्रमाच्या ठिकाणी ऐनवेळी बदल करावा लागला होता आणि त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री किंवा कोणताही मंत्री उपस्थित नव्हता, यावरून वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर मोदी म्हणाले, "तृणमूल काँग्रेसने केवळ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचाच नव्हे, तर देशातील आदिवासी आणि राज्यघटनेचाही अवमान केला आहे. राष्ट्रपतींचा अवमान करून या पक्षाने सर्व मर्यादा ओलांडल्या."
मोदींनी पुढे म्हटले की, काही दिवसांपूर्वीच देशाच्या राष्ट्रपती आणि आदिवासी समाजातील गौरवशाली कन्या माननीय द्रौपदी मुर्मू बंगालमध्ये आल्या होत्या. संथाळ आदिवासी परंपरेतील एका पवित्र उत्सवात त्यांना सहभागी व्हायचे होते. परंतु, या अहंकारी सरकारने केवळ त्यांच्या कार्यक्रमावर बहिष्कारच टाकला नाही, तर संपूर्ण कार्यक्रमाचे अनागोंदीपणे नियोजन केले. या निर्दयी सरकारच्या राजवटीत दलित, आदिवासी आणि आमच्या गरीब बंधू-भगिनींचा सर्वाधिक छळ होत आहे. आदिवासी समाजावर झालेला अन्याय कोणापासूनही लपलेला नाही; परंतु आता तर तृणमूल सरकारने तर सर्वच मर्यादा ओलांडल्या. आदिवासी समाजाची एक कन्या इतक्या उच्च पदावर विराजमान असल्याने, तृणमूलच्या लोकांना त्यांचा सन्मान पचवता आला नाही.

पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रपती मुर्मू यांचा अपमान हा लक्षावधी आदिवासी आणि महिलांसह देशाची राज्यघटना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही अवमान आहे. हा केवळ एका व्यक्तीचा अपमान नसून, संपूर्ण आदिवासी समाजाचा आणि देशाच्या संविधानाचा अपमान आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.

याशिवाय, पंतप्रधान मोदी यांनी तृणमूल काँग्रेसवर घुसखोरांना वाचवण्याचा आरोप केला. घुसखोरांच्या मतपेढीचे रक्षण करण्यासाठी तृणमूलकडून राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पडताळणीला (एसआयआर) विरोध केला जात आहे, असा दावा त्यांनी केला. या सरकारच्या कार्यकाळात अनियंत्रित बेकायदा स्थलांतरामुळे राज्याच्या अनेक भागांच्या लोकसंख्येचे स्वरूप बदलले आहे, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.

पश्चिम बंगाल दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे १८,६८० कोटी रुपयांच्या दळणवळण प्रकल्पांचे उद्घाटन केले. या प्रकल्पांमुळे पश्चिम बंगाल आणि पूर्व भारताला नवी गती मिळेल, तसेच व्यापार आणि उद्योगाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे प्रकल्प पश्चिम बंगालमध्ये देशाच्या विकासाचा एक नवा अध्याय लिहित आहेत, असे ते म्हणाले.