ईद-उल-फित्र म्हणजे रमजान ईद २१ किंवा २२ मार्च रोजी साजरी होण्याची शक्यता असून हा सण जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात आनंदात शांततेत साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर सणाच्या काळात नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात यासह विविध मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने दिले.
खुलताबाद येथील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, सहायक पोलिस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. शहरात मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा. सर्वत्र स्वच्छता राखण्यात यावी. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे. विशेषतः खुलताबाद शहर परिसरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्याने विविध विभागांच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मागण्यांची दखल घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिला. या शिष्टमंडळात दर्गा कमिटीचे अध्यक्ष एजाज अहमद, शरफोद्दीन रमजानी, माजी नगराध्यक्ष कैसरोद्दीन, मोहम्मद मतीन जहागीरदार आदींचा समावेश होता. यावेळी सर्व उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना ईदच्या निमित्ताने खुलताबाद येथे ईद निमित्त भेट देण्याचे निमंत्रणही शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले. खुलताबाद येथे रमजान ईद हा सण शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याचे माजी नगराध्यक्ष कैसरोद्दीन यांनी सांगितले.







