महिला वकिलावर बलात्कार करून फरार असलेल्या कुख्यात गुन्हेगाराला अखेर गुन्हेशाखेच्या युनिट पाचने बेड्या ठोकल्या. सय्यद राजा गौस वारीस अली (वय ३९, रा. ताजबाग, सक्करदरा), असे अटकेतील गुंडाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, ३९ वर्षीय महिला ही राजाच्या ओळखीची आहे. डिसेंबर २०२४मध्ये एका प्रकरणात जामीन मिळाल्याने राजा हा कारागृहातून बाहेर आला. काही दिवसांनी १५ डिसेंबरला सकाळी त्याने महिलेला मानकापूरमधील कार्यालयात भेटायला बोलावले. त्याने महिलेला कॉफी प्यायला दिली. तिला गुंगी यायला लागली. घरी जाते, असे ती राजाला म्हणाली. राजाने पिस्तुलाचा धाक दाखवून तिला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर राजा याने महिला व तिच्या मुलाला घरी बंधक बनवून ठेवले. राजा तिचे शारीरिक शोषण करायला लागला. २३ फेब्रुवारीला महिलेने त्याच्या तावडीतून सुटका करीत मानकापूर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी राजाविरुद्ध बलात्कारासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर राजा पसार झाला. उपायुक्त गुन्हेशाखा राहुल माकणीकर, साहाय्यक पोलिस आयुक्त अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनात युनिट पाचचे निरीक्षक विनायक गोल्हे व सहकाऱ्यांनी त्याचा शोध घेतला.








