नागपूर शहरात दिवसेंदिवस वाढत असलेला ड्रग्स तस्करीचा मुद्दा मंगळवारी विधानसभेत चांगलाच गाजला. सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रवीण दटके यांच्यासह काँग्रेसचे आमदार डॉ. नितीन राऊत आणि विकास ठाकरे यांनीही या मुद्यावरून अनेक प्रश्न उपस्थित करीत पोलिसांच्या निष्क्रीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शहरातील आमदारांनी सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत, ‘राज्य शासन अमली पदार्थांविरोधात ‘शून्य सहिष्णू’ (झिरो टॉलरन्स) धोरण राबविणार आहे. अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्या आरोपींची संपत्ती जप्त करण्यासह त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल’, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
शहरातील मोतीबाग येथील ड्रग्सतस्करांच्या घरांवर छापे टाकून गांजा व अग्निशस्त्रांचा साठा जप्त करण्यात आल्याबाबत आमदार प्रवीण दटके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत आमदार विकास ठाकरे, विक्रम पाचपुते आणि डॉ. नितीन राऊत यांनी सहभाग घेतला. ‘संबंधित प्रकरणात सामाजिक गुन्हेगारी नियंत्रण कायदा-१९९९ अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील टप्प्यात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे. तर, बेकायदा बांधकाम आढळल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नोटीस देऊन महापालिकेमार्फत योग्य ती कारवाई केली जाईल. तसेच संबंधित भागात विशेष मोहीम राबवून अशा गुन्ह्यांना आळा घालण्यात येईल. भविष्यात अशा घटना घडल्यास संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्यात येईल’, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
१,२५४ किलो अमली पदार्थ जप्त
‘नागपूर पोलिसांनी ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कारवाया करीत गेल्या ११ महिन्यांत ९०७ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवायांमध्ये सुमारे १ हजार २५४ किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत अंदाजे १० कोटी रुपये आहे. राज्यात ड्रग्सविरोधी कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२३ रोजी अँटी नार्कोटिक टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. ही यंत्रणा राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांपर्यंत विस्तारण्यात आली असून नवीन पदनिर्मितीद्वारे ती अधिक बळकट करण्यात आली आहे. केंद्र शासन व इतर राज्यांशी समन्वय वाढवून गुप्त माहितीची देवाणघेवाण केल्यामुळे आंतरराज्य व आंतरराष्ट्रीय ड्रग्स टोळ्यांवर कारवाई शक्य होत आहे’, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.








