पोलिस आयुक्तालयाबाहेर नागरिकांचा ठिय्या

महाराष्ट्र टाइम्स

नाशिक शहरातील टिळकवाडी परिसरात मंदिराच्या जागेवरून वाद सुरू आहे. यावर तोडगा काढण्यासाठी नागरिकांनी पोलिस आयुक्तालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. कोणताही संघर्ष नको असल्याने प्रशासनाने संवादातून निर्णय घ्यावा, अशी मागणी आहे. जागेवर अतिक्रमण होत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. पोलिसांनी चौकशीचे आश्वासन दिले आहे. सन्मानजनक तोडगा निघेपर्यंत शांततेच्या मार्गाने लढा सुरू ठेवण्याचा निर्धार आहे.

पोलिस आयुक्तालयाबाहेर नागरिकांचा ठिय्या
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

शहरातील टिळकवाडी परिसरातील एका मंदिराच्या जागेवरून काही दिवसांपासून रहिवाशांमध्ये मतभेद असल्याने या वादावर तोडगा काढण्याच्या मागणीसाठी काही नागरिकांनी मंगळवारी (दि.१७) पोलिस आयुक्तालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले.

कोणताही संघर्ष किंवा तेढ निर्माण होऊ नये, म्हणून प्रशासनाने संवादाद्वारे याप्रकरणी योग्य निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. आंदोलक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, टिळकवाडी भागातील १,२८३ मीटरचा प्लॉट संबंधित सोसायटीच्या मालकीचा आहे. तेथे दत्तगुरू आणि पवनसूत हनुमान या देवतांची जुनी मंदिरे होती. दोन महिन्यांपूर्वी या मंदिरांचे रीतसर स्थलांतर करून नवीन मंदिर बांधण्यात आले. मात्र, काही दिवसांपासून बाहेरील व्यक्ती या जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून रहिवाशांनी प्रशासकीय स्तरावर दाद मागण्याचा निर्णय घेतला.

आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या प्रतिनिधींनी सांगितले, की नाशिक हे शांतताप्रिय शहर असून, आमचा समाज अहिंसेला मानणारा आहे. आम्हाला कोणताही हिंसाचार किंवा संघर्ष नको असल्याने आम्ही आत्मदहनाचा विचार सोडून प्रशासनाकडे शांततेने न्याय मागण्यासाठी आलो आहोत. या वादावर सामोपचाराने मार्ग काढण्यासाठी आगामी २० मार्चपर्यंतचे सर्व नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात यावेत, जेणेकरून चर्चेसाठी वेळ मिळेल, अशी मागणी करण्यात आली. सोसायटीच्या मालकीच्या जागेला आणि मंदिराला तातडीने पोलिस संरक्षण देण्यात यावे आणि दोन्ही बाजूंच्या वरिष्ठ व्यक्तींनी एकत्र बसून हा विषय मिटवावा, असे आवाहनही या रहिवाशांनी केले आहे. पोलिसांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले. प्रशासनाच्या या आश्वासनानंतर नागरिकांनी समाधान व्यक्त केले असले, तरी जोपर्यंत या वादावर सन्मानजनक तोडगा निघत नाही, तोपर्यंत शांततेच्या मार्गाने लढा सुरूच ठेवण्याचा निर्धारही व्यक्त केला आहे.