सिल्लोड येथील इंद्रराज महाविद्यालयात ‘ उदयोन्मुख भारत ’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. ही परिषद उत्साहात झाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व इंद्रराज महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीने ‘उदयोन्मुख भारत’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव अशोक देवरे हे होते. तर उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे कुलसचिव तथा राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रशांत अमृतकर, रफिक झकेरिया महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मक़दूम फारुकी हे होते. तर परिषदेचे बीजभाषक म्हणून प्रख्यात राजकीय विचारवंत डॉ. बी. वाय. कुलकर्णी यांनी आपले विचार मांडले.
प्रमुख उपस्थितीमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.जी.राजपूत हे होते, तसेच परिषदेचे तथा कार्यक्रमाचे संयोजक राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सतीश कराड होते.
या वेळी डॉ. प्रशांत अमृतकर यांनी भारताच्या उदयाकरिता भारतीय विकास प्रवाहात कोणकोणत्या गोष्टींना महत्त्व आहे, यावर प्रकाश टाकला. डॉ. बी. वाय. कुलकर्णी यांनी आपल्या बीजभाषणामध्ये ‘उदयोन्मुख भारत’ या संकल्पनेवर प्रकाश टाकताना केवळ भौतिक विकास हाच एकमेव निकष नसून भारतीय ग्रामीण भागातील ग्रामीण संस्कृतीतील जीवन मूल्य व्यवस्था कशी श्रेष्ठ होती, तद्वत ती पुन्हा प्रस्थापित करून भारत जगाचे नेतृत्व कसा करू शकतो याबद्दल आपली भूमिका व्यक्त केली.








