राज्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास विभागाकडून अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात पुढील दोन वर्षांत युवकांना रोजगार आणि उद्योजकतेच्या अधिकच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त करत कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राज्यात कौशल्य विकासातून रोजगाराच्या नव्या संधीसाठी ३० लाख युवक-युवतींसाठी विशेष योजना सुरू करण्यात आली असल्याचे सांगितले.
विधान परिषदेत आमदार विक्रांत पाटील नियम ९२ अन्वये उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना मंत्री लोढा बोलत होते. ते म्हणाले, कौशल्य विकास क्षेत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यात मॉडेल करिअर सेंटरच्या माध्यमातून २०२५-२६ या वर्षात १ लाख १२ हजारावर युवकांना वैयक्तिक मार्गदर्शन करण्यात आले आहे. राज्यातील युवकांना परदेशात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी मुंबई विद्यापीठात स्वामी विवेकानंद कौशल्य विकास इंटरनॅशनल अकॅडमी सुरू करण्यात आली आहे. याशिवाय आणखी सहा ठिकाणी अशा अकॅडमी सुरू करण्यात आल्या असून या अकॅडमीमध्ये विविध परदेशी भाषांचे प्रशिक्षण दिले जात असल्याचेही ते म्हणाले.








