‘मनमानी बदल्या, बुलडोझर वापर हा कट’

महाराष्ट्र टाइम्स

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी नायब राज्यपाल प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. मनमानी बदल्या आणि बुलडोझरचा वापर हा निवडून आलेल्या सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा कट असल्याचे ते म्हणाले. जम्मू विकास प्राधिकरणाने बांधकामे पाडल्याने आणि पत्रकाराचे घर जमीनदोस्त केल्याने हा वाद निर्माण झाला आहे. अब्दुल्ला यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

arbitrary actions of the governors administration omar abdullah accuses administration
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी नायब राज्यपाल प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. राजभवनाकडून मनमानी बदल्या आणि बुलडोझरचा वापर हे केंद्रशासित प्रदेशातील निवडून आलेल्या सरकारची प्रतिमा मलिन करण्याच्या कटाचा भाग असल्याचा आरोप त्यांनी केला. जम्मू विकास प्राधिकरणाने जम्मू-काश्मीरमध्ये काही बांधकामे पाडली असून, गुरुवारी जम्मूतील एका पत्रकाराचे घर जमीनदोस्त करण्यात आले. या पार्श्वभूमीवर ओमर अब्दुल्ला यांनी ही प्रतिक्रिया दिली. या कारवाईवर सर्व स्तरांतून टीका होत आहे.

ओमर अब्दुल्ला यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, "राजभवनाकडून नियुक्त अधिकारी निवडून आलेल्या सरकारची परवानगी न घेता, संबंधित मंत्र्याशी सल्लामसलत न करता स्वतंत्रपणे बुलडोझर वापरतात. निवडून आलेल्या सरकारला बदनाम करण्याचा डाव असल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत." त्यांच्या मते, या प्रकारांमुळे सरकारला विभागांमध्ये क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार असण्याची गरज अधोरेखित होते. ते म्हणाले की, प्रधान सचिव, आयुक्त सचिव आणि अतिरिक्त मुख्य सचिव यांसारख्या पदांवर नियुक्ती करणे ठीक असले तरी, विकास अधिकाऱ्यांसारख्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या पदांवर नियुक्ती निवडून आलेल्या सरकारने करायला हवी. महसूल कर्मचाऱ्यांची नियुक्तीसुद्धा त्यांच्या परवानगीने व्हायला हवी. दुर्दैवाने, त्यांच्याशी कोणतीही चर्चा न करता या पदांवर अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. मग ते अधिकारी दुसरीकडून आदेश घेतात, बुलडोझर काढतात आणि कारवाई सुरू करतात, असे त्यांनी स्पष्ट केले.