ठाण्यातील कंपन्यांच्या निर्यातीला फटका

Contributed byटीम मटा|महाराष्ट्र टाइम्स

ठाण्यातील कंपन्यांच्या निर्यातीला अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाचा फटका बसला आहे. मध्य-पूर्वेकडील देशांमध्ये होणारी निर्यात थांबली आहे. माल बंदरात अडकून पडल्याने कंपन्यांमध्ये जागा शिल्लक नाही. यामुळे उद्योजकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्या असून ऑर्डर रद्द होण्याची भीती आहे. शेकडो उद्योजक तणावात असून युद्ध थांबण्याची वाट पाहत आहेत.

increasing hurdles in thane exports discussion on war impact
अमेरिका आणि इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाच्या वाढत्या संकटामुळे ठाणे जिल्ह्यातील उद्योगांना मोठा फटका बसला आहे. गेल्या दहा ते बारा दिवसांपासून मध्य-पूर्वेकडील देशांमध्ये निर्यात होणारा माल कंपन्यांमध्येच अडकून पडला आहे. यामुळे नवीन तयार होणारा माल ठेवण्यासाठी कंपन्यांमध्ये जागा शिल्लक नाही. निर्यात आणखी काही दिवस रखडल्यास आर्थिक आणि इतर समस्यांना तोंड द्यावे लागेल, अशी चिंता उद्योजकांनी व्यक्त केली आहे.

कतार, दुबईसह मध्यपूर्वेकडील अनेक देशांमध्ये विविध प्रकारच्या वस्तूंची निर्यात केली जाते. मात्र, युद्धामुळे परदेशी जाणारे कंटेनर जेएनपीए (जवाहरलाल नेहरू पोर्ट) येथे अडकून पडले आहेत. ठाण्यातील उद्योजक जयेश शहा यांनी सांगितले की, त्यांच्या कंपनीत तयार होणारा माल मध्यपूर्वेकडील देशांमध्ये पाठवायचा आहे, पण युद्धामुळे तो पाठवता आलेला नाही. वेळेत माल न मिळाल्यास तिथले ग्राहक त्यांच्या देशातच तो माल उपलब्ध करून घेण्याचा पर्याय निवडू शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पारिख यांनीही युद्धामुळे निर्यात ठप्प झाल्याने उद्योजकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.
डोंबिवलीतील इंजिनीअरिंग, केमिकल, टेक्सटाईल, मेडिसिन आणि डाइज कंपन्या जगाच्या कानाकोपऱ्यात सुमारे ४ हजार कोटींच्या मालाचा पुरवठा करतात. या उद्योगांनाही युद्धाची झळ बसली आहे. एकीकडे कच्च्या मालाचा पुरवठा मंदावला आहे आणि त्याच्या किमती वाढल्या आहेत. दुसरीकडे, तयार माल वेळेत पोहोचला नाही तर ऑर्डर रद्द होण्याची भीती वाढली आहे. उत्पादित माल बंदरात अडकून पडल्याने ऑर्डर वेळेत पोहोचत नाहीत. त्यामुळे ग्राहकांनी ऑर्डर नाकारल्यास उद्योजक कर्जबाजारी होण्याची आणि उद्योग बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे. याबाबत ‘कामाचे’ माजी अध्यक्ष देवेन सोनी यांनी सांगितले की, एमआयडीसीतील शेकडो उद्योजक सध्या तणावात असून युद्ध थांबण्याची वाट पाहत आहेत.