मुंबई महापालिकेच्या मुख्य तसेच, उपनगरीय रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांना अनेकदा अन्य रुग्णालयांमध्ये संदर्भित करताना किंवा औषधांच्या, वैद्यकीय उपकरणे नसल्याने अन्य रुग्णालयांमध्ये पाठवावे लागल्यास जबरदस्तीने डामा (डॉक्टरांच्या संमतीशिवाय जातोय) असे लिहून घेतले जाते. ही गंभीर बाब ‘महाराष्ट्र टाइम्स’ने निदर्शनास आणून दिली होती. त्याची दखल घेऊन महापालिकेने विशेष नियमावली (प्रोटोकॉल) तयार केली आहे. त्यानुसार, आपत्कालीन विभागात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याने उपचार द्यावे; तो नसेल तर रजिस्टार, बंधपात्रित डॉक्टरांच्या युनिटने उपचार सुरू करावे. शिकाऊ विद्यार्थी डॉक्टरांच्या जीवावर रुग्णाला सोडू नये, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कोणत्याही कारणासाठी रुग्णाला अन्य रुग्णालयामध्ये न्यावे लागल्यास तशी नोंद करावी; त्यासाठी तयार केलेल्या मेमोमधील माहिती, रुग्णाच्या आजाराचे निदान, कोणते उपचार सुरू आहेत, इतर रुग्णालयांमध्ये संदर्भित करण्यामागील नेमके कारण, ज्या रुग्णालयामध्ये रुग्णाला संदर्भित करण्यात येत आहे, तेथील डॉक्टरांच्या संपर्क क्रमांकाची माहिती द्यावी; रुग्णाला आपत्कालीन विभागातून थेट अन्य रुग्णालयामध्ये पाठवू नये; अर्धवट किंवा वैद्यकीय उपचार न देता रुग्णाला एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयामध्ये संदर्भित करू नये; रुग्णाला संदर्भित करताना रुग्णवाहिकेमध्ये औषधे, ऑक्सिजन, सिलिंडर तसेच, अन्य वैद्यकीय सामुग्रीचा पुरेसा साठा असणे आवश्यक आहे, अशा स्पष्ट सूचना उपनगरीय रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधीक्षकांनी दिल्या आहेत.
आपत्कालीन विभागामध्ये येणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याने तेथील एमएलसी रजिस्टरमध्ये त्याचे नाव, ड्युटी सुरू होण्याची तसेच, ती संपण्याची वेळ, त्यांची ड्युटी संपल्यानंतर त्यानंतर कोणते डॉक्टर रुजू होणार आहेत, याची माहिती देणे अपेक्षित आहे. रुग्णाचा पत्ता, नाव, लिंग आणि एमएलसी क्रमांक, कोणत्या नातेवाइकाने किंवा पोलिसांनी त्याला रुग्णालयामध्ये आणले, याची माहिती द्यायची आहे.



