जमिनीच्या वादातून तरुणावर खुनी हल्ला

महाराष्ट्र टाइम्स

पुणे-नगर महामार्गालगत कासारी फाटा येथे जमिनीच्या जुन्या वादातून एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाला. हल्लेखोराने तरुणावर जीवघेणा हल्ला केला आणि त्याची कारही तोडली. शिक्रापूर पोलिसांनी मुख्य आरोपी विक्रम रासकर याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी आणखी चौघांवर गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास सुरू आहे.

murderous attack on youth due to land dispute in pune

पुणे-नगर महामार्गालगत असलेल्या कासारी फाटा (ता. शिरूर) येथे जमिनीच्या जुन्या वादातून एका युवकावर प्राणघातक हल्ला करून त्याच्या कारची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून, न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात केली.

कासारी फाटा परिसरातील महेश ब्राह्मणे यांच्या जमिनीच्या खरेदी-विक्रीवरून आरोपी विक्रम रासकर याच्याशी त्यांचा अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. घटनेच्या दिवशी ब्राह्मणे आणि रासकर दोघेही संबंधित जमिनीनजीक आले असता, त्यांच्यात वाद होऊन त्याचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले.

या वेळी आरोपीने केवळ मारहाणच केली नाही, तर एका युवकाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि तेथील कारची बरीच तोडफोड केली. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी तपासाअंती विक्रम कांतिलाल रासकर (वय ३९, रा. रासकर मळा, कासारी) याच्याविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला व त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. या प्रकरणात विक्रम रासकरसह गणेश ब्राह्मणे, महेश ब्राह्मणे, पृथ्वीराज पिसाळ आणि एका अनोळखी युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक महेश डोंगरे आणि प्रतीक जगताप करीत आहेत.