तेलंगण येथून जळगाव खान्देशातील पाचोरा तालुक्यातील वाघुलखेडा येथे मूळगावी परतणाऱ्या दाम्पत्याचा मुंबई-नागपूर महामार्गालगत असलेल्या विहिरीत कार कोसळून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
पद्मसिंग दामू पाटील (वय ४९) व नम्रता पद्मसिंग पाटील (वय ४५) असे ठार झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे. पद्मसिंग हे तेलंगणमधील सीतापूरम येथे सिमेंट कंपनीत नोकरीला होते. २७ नोव्हेंबरला लग्न सोहळ्याकरिता तेलंगण येथून कारने गावाकडे परतत होते. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी शिवारात नियंत्रण सुटून त्यांची कार महामार्गाला लागून अगदी दहा-पंधरा फूट अंतरावर असलेल्या विहिरीत कोसळली. महामार्गालगत असलेली विहीर बुजविण्यात आली नाही किंवा तेथे संरक्षक कठडे लावलेले नसल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर या घटनेला कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे.
मोबाइल बंदने संशयकल्लोळ
पाटील पती-पत्नी घरी पोहोचले नाहीत म्हणून कुटुंबीय चिंतेत होते. त्यांचा शोध घेण्यात आला, परंतु ते सापडले नाहीत. त्यांची कारही आढळून आली नाही. नातेवाइक संदीप रमेश पाटील यांनी नांदुरा पोलिस ठाण्यात २८ नोव्हेंबरला मिसिंगची तक्रार दाखल केली. त्यांच्या मोबाइलचे शेवटचे लोकेशन वडनेर भोलजी शिवार दर्शविले. त्यांचे काय झाले असावे, या शिवारातून दोघेही अचानक बेपत्ता झाले, तेथेच मोबाइल बंद झाल्याने घातपाताचा संशय बळावला होता.



