भारताचा निकी पूना ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळणार आहे. फाफ डुप्लेसिस आयपीएलऐवजी पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळणार आहे. ज्युनिअर मुलांच्या हॉकी वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने ओमानचा १७-० असा पराभव केला. भारतीय संघाने चिलीचाही पराभव केला होता. भारतीय संघाने 'ब' गटात अव्वल स्थान मिळवले आहे.
चेन्नई: भारतीय टेनिसपटू निकी पूनाचाने थायलंडच्या प्रुच्या इसारो सोबत दुहेरीत खेळताना पुढील वर्षी होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. आशिया-पॅसिफिक वाइल्ड कार्ड प्ले-ऑफ स्पर्धेच्या अंतिम फेरीत निकी आणि इसारो यांनी जपानच्या शुनसुके-युसुके कुसुहारा या जोडीला ६-४, ६-३ असे हरवून विजेतेपद पटकावले. या विजयामुळे त्यांचे ऑस्ट्रेलियन ग्रँड स्लॅममधील स्थान निश्चित झाले आहे.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी क्रिकेटपटू फाफ डुप्लेसिसने १४ वर्षांनंतर आयपीएल टी-२० स्पर्धेत भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी, डुप्लेसिस २०२६ मध्ये पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) मध्ये खेळणार आहे. ४१ वर्षीय डुप्लेसिसने सांगितले की, "नवे आव्हान स्वीकारत मी पाकिस्तान लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. ही नवी संधी असून, खेळाडू म्हणून मला आणखी प्रगल्भ करेल." ही पीएसएल लीग देखील आयपीएलप्रमाणे पुढील वर्षी मार्च आणि मे दरम्यान आयोजित केली जाईल. डुप्लेसिसने २०१८ आणि २०२१ मध्ये चेन्नई सुपर किंग्जला आयपीएलचे विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.याचबरोबर, भारतीय ज्युनियर हॉकी संघाने ज्युनिअर मुलांच्या हॉकी वर्ल्ड कपमध्ये ओमानवर १७-० असा मोठा विजय मिळवला आहे. अर्शदीप, मनमीत आणि दिलराज यांनी प्रत्येकी तीन गोल केले, तर अजित, गुरज्योत आणि इगालेम्बा यांनी प्रत्येकी दोन गोल केले. अनमोल आणि शारदानंद यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. हा भारताचा सलग दुसरा विजय आहे. याआधी भारताने चिलीला ७-० ने हरवले होते. भारताची पुढील लढत २ डिसेंबरला स्वित्झर्लंडशी होणार आहे. स्वित्झर्लंडने चिलीला ३-२ ने पराभूत केले आहे. 'ब' गटामध्ये सहा गुणांसह भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. 'अ' गटामध्ये जर्मनीने कॅनडावर ७-० असा दणदणीत विजय मिळवला.