दहशतवाद्यांनी ७२ तळ हलवले

Contributed byजम्मू,महानिरीक्षक|महाराष्ट्र टाइम्स

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ७२ तळ देशात आत हलवले आहेत. सीमेवर सध्या दहशतवाद्यांची हालचाल दिसत नाही. मात्र, सरकारचा आदेश आल्यास सीमा सुरक्षा दल शत्रूचे मोठे नुकसान करण्यास सज्ज आहे. १९६५, १९७१, १९९९ कारगिल युद्ध आणि ऑपरेशन सिंदूरचा अनुभव सीमा सुरक्षा दलाला आहे. पाकिस्तानी सैनिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.

दहशतवाद्यांनी ७२ तळ हलवले
‘ ऑपरेशन सिंदूर ’नंतर पाकिस्तानने दहशतवाद्यांचे तळ देशाच्या आत हलवले आहेत. मात्र, सरकारने सीमेपलीकडे कारवाईचा आदेश दिल्यास भारतीय सुरक्षा दल शत्रूचे मोठे नुकसान करण्यास सज्ज आहे, असे सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक विक्रम कुँवर यांनी सांगितले. मेमध्ये झालेल्या शस्त्रसंधीचा आदर राखला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सीमा सुरक्षा दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तान ातील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. यानंतर पाकिस्तान सरकारने हे तळ देशात आणखी आत, जसे की सियालकोट आणि जफरवाल शहरांच्या आसपास हलवले आहेत. किमान १२ तळ या शहरांच्या आत कार्यरत आहेत, जे सीमेपासून दूर आहेत. याशिवाय, ६० इतर तळही सीमेपासून दूर देशाच्या अंतर्गत भागात हलवण्यात आले आहेत.
महासंचालक कुँवर यांनी महानिरीक्षक शशांक आनंद आणि महासंचालक कुलवंतराय शर्मा यांच्यासोबत पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. दहशतवादी एकाच ठिकाणी थांबत नाहीत. जेव्हा त्यांना भारतात घुसखोरी करायची असते, तेव्हा हे तळ सक्रिय होतात. ते एका वेळी दोन किंवा तीन गटांपेक्षा जास्त दहशतवादी ठेवत नाहीत. सध्या आंतरराष्ट्रीय सीमेवर दहशतवाद्यांचे तळ नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

महासंचालक कुँवर यांनी सांगितले की, दहशतवाद्यांच्या या नवीन तळांमध्ये सध्या दहशतवादी पाठवले जात असल्याची माहिती आहे. याचा अर्थ असा की, दहशतवादी इतरत्र जाण्यापूर्वी तिथे प्रशिक्षण घेत आहेत.

महानिरीक्षक आनंद यांनी सांगितले की, जर सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर’ पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला, तर सीमा सुरक्षा दल आदेशाचे पालन करण्यास तयार आहे. १९६५, १९७१, १९९९ चे कारगिल युद्ध असो वा ‘ऑपरेशन सिंदूर’, सीमा सुरक्षा दलाला सर्व प्रकारच्या युद्धांचा चांगला अनुभव आहे. सध्या तरी सीमेवर दहशतवाद्यांची कोणतीही मोठी हालचाल दिसत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तानी सैनिक आपली ठाणी सोडून पळून गेले होते. आता ते पुन्हा परत येत आहेत, असे महानिरीक्षक शशांक आनंद यांनी सांगितले. सीमा सुरक्षा दलाने त्यांची जी अवस्था केली होती, त्यातून सावरण्यासाठी त्यांना बराच वेळ लागत आहे. काही ठिकाणी ते पुन्हा संरक्षण मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांच्या प्रत्येक हालचालीवर आमची बारीक नजर आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.