पुस्तकांसाठी वेडी माणसे तयार व्हावीत

महाराष्ट्र टाइम्स

वर्ध्यात आयोजित पहिल्या वाचन संस्कृती साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंढे यांनी पुस्तकांचे महत्त्व सांगितले. पुस्तकांमुळे चांगली माणसे घडतात आणि वाचन संस्कृती वाढते. केवळ पुस्तके वाचून उपयोग नाही, तर त्या वाचनाची चिकित्सा करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात वाचन संस्कृतीची अवस्था सुधारण्याची गरज आहे. या संमेलनातून वाचन चळवळ उभी राहण्याची आशा आहे.

पुस्तकांसाठी वेडी माणसे तयार व्हावीत
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

चांगली माणसे घडविण्यात पुस्तके महत्त्वाची भूमिका बजावत असतात. म्हणून पुस्तकाचे व्यसन लागले पाहिजे. पुस्तकांसाठी वेडे झाले पाहिजे. पुस्तकासाठी वेडी होणारी माणसे जोवर तयार होणार नाही, तोवर वाचन संस्कृती वाढणार नाही, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष डॉ. राजेंद्रे मुंढे यांनी केले.

मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई व लोक महाविद्यालय वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या वाचन संस्कृती साहित्य संमेलनाचे उद्घाटन शनिवारी वर्ध्याच्या लोक महाविद्यालयातील आचार्य विनोबा भावे साहित्यनगरीत झाले. यावेळी डॉ. मुंढे बोलत होते.

ज्येष्ठ विचारवंत डॉ. नीरज हातेकर हे संमेलनाचे उद् घाटक होते. प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, ‘महाराष्ट्र टाइम्स’चे निवासी संपादक श्रीपाद अपराजित, ग्रंथालय संघ तथा लोक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष; संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार, मराठवाडा विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड उपस्थित होते.

डॉ. मुंढे म्हणाले, वाचन, संस्कृती, साहित्य हे तीन वेगवेगळे शब्द आहेत. हे तिन्ही शब्द महत्त्वाचे आहेत. सहा हजार वर्षांपूर्वीदेखील वाचन होते. ते मौखिक वाचन होते. पुस्तकामुळे माणसाची एकाग्रता वाढते. पुस्तके माणसाला एकनिष्ठ ठेवतात. मेंदूचे विचलन, विचारांचे विचलन यासाठी पुस्तके महत्वाची ठरतात. आज काय खावे आणि काय प्यावे यासह अनेक गोष्टींवर बंदी आली आहे. पण वाचनावर बंदी नाही. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.

डॉ. हातेकर म्हणाले, केवळ पुस्तके वाचून होत नाही. त्या वाचनाची चिकित्सा करता आली पाहिजे. त्यातून प्रश्न निर्माण झाले पाहिजे. पुराव्यासहित उत्तरे शोधता आली पाहिजे. अशा वाचनातूनच आपण स्वतः घडू शकतो आणि समाजपरिवर्तनही होऊ शकते.

प्रस्थापित वर्गाने नवोदितांना संधी देण्याची भूमिका स्वीकारावी, असे आवाहन श्रीपाद अपराजित यांनी केले. सामान्यांनाच सदाचाराची आस असते. नव्या पिढीला पुस्तकांचे विश्व सोपवून संशोधनाकडे वळविण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी विविध उदाहरणांद्वारे भर दिला.

दाते म्हणाले, ‘वाचाल तर वाचाल’ या उद्देशाने वाचन चळवळ पुढे जायला पाहिजे. माणसे जेव्हा माणसाला वाचायला लागतील तेव्हाच माणूस माणसाला कळेल.

स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. कोटेवार यांनी ग्रामीण भागात वाचन संस्कृतीची अवस्था आज काय आहे याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, गावात गेल्यावर आज कळते की, साठ टक्के लोक अजूनही वाचन प्रवाहात आले नाही. सत्ता आणि संपत्ती बाजूला ठेऊन या लोकांना वाचन प्रवाहात आणण्याचे काम हे साहित्य संमेलन करू शकते. गावागावात वाचन चळवळ उभी राहिली पाहिजे, असा आशावादही व्यक्त केला.

संमेलनाला ज्येष्ठ कवी प्रा. तीर्थराज कापगते, प्रा. शेख हासीम, मुरलीधर बेलखोडे, गुणवंतराव डखरे, हेमचंद्र वैद्य आदी उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळी लोक महाविद्यालयातून ग्रंथदिंडी काढण्यात आली होती.