‘पुणे ग्रामीण’, सांगली उपांत्य फेरीत दाखल

महाराष्ट्र टाइम्स

आमदार चषक राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत पुणे ग्रामीण आणि सांगली संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. बोपखेल येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात पुणे ग्रामीणने ठाणे शहर संघावर मात केली. सांगलीने मुंबई उपनगर पूर्व संघाला हरवले. मुलांच्या गटात अहिल्यानगर आणि ठाणे ग्रामीण संघ विजयी झाले. ठाणे ग्रामीणने कोल्हापूर संघावर रोमहर्षक विजय मिळवला.

pune rural and sangli teams enter semifinals in kabaddi

पुणे ग्रामीण, सांगली या संघांनी कुमार-कुमारी गटाच्या आमदार चषक राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.

बोपखेल येथे ही स्पर्धा सुरू आहे. मुलींच्या गटात वैभवी जाधव, कोमल जाधव यांच्या चढाया आणि सानिका वास्के, तनिष्का यांनी केलेल्या पकडींच्या जोरावर पुणे ग्रामीण संघाने ठाणे शहर संघावर ४५-३० अशी मात केली. मध्यंतराला पुण्याने २६-८ अशी आघाडी घेतली होती. हीच आघाडी अखेरीस निर्णायक ठरली. ठाण्याकडून समृद्धी म्हणगडे, वेदिका वावेकर यांनी दिलली लढत अपुरी पडली.

दुसऱ्या लढतीत भक्ती महाडिकने केलेल्या चढाया आणि रिया हिप्परकरने केलेल्या पकडींच्या जोरावर सांगली संघाने मुंबई उपनगर पूर्व संघाचा २६-२२ असा पराभव केला. मुंबई उपनगर पूर्व संघाकडून सरेना म्हसकर, सानिका लिपाणे यांनी कडवी झुंज दिली.

मुलांच्या गटात अहिल्यानगर संघाने पालघर संघावर ५०-३० असा विजय मिळवला. मध्यंतराला अहिल्यानगर संघाने ३०-१८ अशी आघाडी घेतली होती. विजयात वेदान्त उंद्रे, अभिजित साळुंखे, शिवम गोरडे, महेश परदेशी यांनी मोलाचा वाटा उचलला. पालघरकडून जस्मित राऊत, सुमीत यादव यांनी दिलेली लढत अपुरी पडली.

ठाणे ग्रामीण संघाने कोल्हापूर संघावर ३५-३४ असा रोमहर्षक विजय नोंदवला. निर्धारित वेळेत सामना २९-२९ असा बरोबरीत सुटला होता. त्यानंतर पाच-पाच चढायांमध्ये ठाणे ग्रामीण संघाने बाजी मारली. यात यश पाटीलने शेवटच्या चढाईत मिळवलेले दोन गुण निर्णायक ठरले. याशिवाय ठाण्याच्या विजयात जितसिंग सैनी, तंजिम खान, रौनक पाटील, मयुरेश वाघ यांनी मोलाचा वाटा उचलला. कोल्हापूरकडून शुभम रेपे, सुजल हेगडे, भूषण पाटील यांनी कडवी झुंज दिली.