तोतयांच्या माध्यमातून देशात प्रवेशाचा प्रयत्न

महाराष्ट्र टाइम्स

तोतया आयएएस अधिकारी कल्पना भागवत आणि तिचा प्रियकर महंमद अशरफ खिल यांच्या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. खिल याला भारतात आणण्यासाठी भागवत प्रयत्न करत होती. तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे बनावट ओएसडी अभिषेक चौधरी असल्याचे भासवून डिंपी हरजाईने फसवणूक केली. या तिघांनी अनेक ठिकाणी प्रवास केला.

तोतयांच्या माध्यमातून देशात प्रवेशाचा प्रयत्न
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

तोतया आयएएस महिला अधिकारी कल्पना भागवत हिच्या प्रकरणात आणखी माहिती समोर येत आहे. तिचा प्रियकर महंमद अशरफ खिल याचा पाकिस्तानातील भाऊ अहमद यामा गालिफ याला भारतात प्रवेश मिळवून देण्यासाठी ती प्रयत्न करीत होती.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कथित विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) ‘अभिषेक चौधरी’ यांच्या नावाने डिंपी देवेंद्र हरजाई याने ओळख दाखवून गंडा घातल्याचे उघड झाले. या प्रकरणाचा सध्या सिडको पोलिसांकडून तपास सुरू आहे. आगामी काळात संशयितांचा तपास करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेची (एनआयए) मदत घेण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. भागवतचा प्रियकर महंमद अशरफ खिल हा गायब झाला होता. त्याने मोबाइल बंद करून ठेवला होता. अखेर त्याला दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन येथून दिल्ली पोलिसांच्या मदतीने सिडको पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणातच गृहमंत्री शहा यांचा तोतया ओएसडी हरजाई याला पालम येथून ताब्यात घेण्यात आले आहे. भागवतच्या खात्यात, खिल याच्या खात्यावरून पैसे टाकल्याचीही माहिती समोर आली आहे. खिल याच्या ओळखीच्या काही व्यक्तींचा पासपोर्ट तयार करून देण्याचे काम देण्यात आले होते. या प्रकरणात तोतया कल्पना भागवत, डिंपी हरजाई व खिल या तिघांनी देशात जयपूर, उदयपूर, राजस्थान आणि मणिपूरसह दिल्लीत अनेक वेळा प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, खिल व डिंपी हरजाई यांना न्यायालयाने दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.