सॉफ्टवेअर अपडेटमुळे विमानसेवा विस्कळीत

महाराष्ट्र टाइम्स

एअरबस ए-३२० विमानांच्या सॉफ्टवेअर अपडेटमुळे शनिवारी अनेक विमानांना विलंब झाला. मुंबई विमानतळावर ९० टक्के विमानांचे उड्डाण उशिराने झाले. इंडिगो, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या सेवांवर परिणाम झाला. नागपूर-मुंबई इंडिगो विमान रद्द झाले. देशभरातील प्रमुख शहरांमधील विमानतळांवर ही प्रक्रिया पार पडली.

सॉफ्टवेअर अपडेटमुळे विमानसेवा विस्कळीत
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

एअरबस कंपनीच्या ए-३२० विमानांचे सॉफ्टवेअर अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमुळे शनिवारी दिवसभरात अनेक विमानांना विलंब झाला. याचा फटका प्रवाशांना बसला असून मुंबई विमानतळावरून दिवसभरात ९० टक्के विमानांचे उड्डाण विलंबाने झाल्याचे समजते. ए-३२० विमानांमुळे प्रामुख्याने इंडिगो, एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस या विमानसेवांवर परिणाम झाला तरी या विमानांना झालेल्या विलंबाचा परिणाम इतर सेवांवरही झाल्याचे चित्र समोर आले.

सॉफ्टवेअर अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेत भारतातील ए-३२० च्या ३३८ विमानांवर परिणाम झाला. शनिवारी रात्री उशिरापर्यंत ८० टक्के विमानांमधील सॉफ्टवेअर अद्ययावत करण्याचे काम पूर्ण झाले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) दिलेल्या माहितीनुसार इंडिगो आणि एअर इंडियाने दिवसभरात विमानांचे उड्डाण रद्द केलेले नाही तर एअर इंडिया एक्सप्रेसने चार विमानांचे उड्डाण रद्द केले. या समस्येचे निराकरण करण्यासाठी सॉफ्टवेअर अद्ययावत करणे आवश्यक होते. इंडिगोकडील एकूण २०० विमानांवर परिणाम झाला तर एअर इंडियाच्या ११३ विमानांवर परिणाम झाला. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत एअर इंडिया एक्स्प्रेसच्या २५ विमानांवर परिणाम झाला होता. देशातील दिल्ली, बेंगळुरू, मुंबई, चेन्नई, हैदराबाद, अहमदाबाद आणि कोलकाता येथील एअरलाइन्सच्या तळांवर सॉफ्टवेअर अद्ययावत करण्याची प्रक्रिया पार पडली.

नागपूर-मुंबई विमान रद्द

नागपूर : विमानांना होत असलेल्या विलंबाची श्रुंखला शनिवारीदेखील कायम होती. शनिवारी नागपूर–मुंबई जाणारे इंडिगोचे विमान रद्द झाले. सायंकाळी ६.३५ वाजताचे इंडिगोचे नागपूर–दिल्ली विमान १ तास उशिराने उडाले. नागपूर–मुंबई विमानदेखील १ तास २५ मिनिटांच्या उशिराने उडाले. रात्री ११.४० वाजताचे विमान नागपूर-पुणे विमान ३० मिनिटे उशिराने उडाले. पहाटे ३.१० वाजताचे नागपूर–पुणे विमानही ४० मिनिटे उशिराने उडाल्याची माहिती आहे.