दमदार सुरुवात श्रीकांतच्या पथ्यावर

महाराष्ट्र टाइम्स

किदाम्बी श्रीकांतने सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याने उपांत्य फेरीत मिथुन मंजूनाथला हरवले. श्रीकांतचा सामना हाँगकाँगच्या जोसन गुनाववनशी होईल. त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीने महिला दुहेरीत अंतिम फेरी गाठली. त्यांनी मलेशियाच्या जोडीला पराभूत केले.

srikanths formidable entry in badminton match
दमदार सुरुवात, चुकांना कात्री आणि गुणांमध्ये सातत्य या त्रिसूत्रीच्या जोरावर किदाम्बी श्रीकांतने सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याचबरोबर, त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद या महिला दुहेरीतील जोडीनेही जेतेपदाच्या लढतीत आपले स्थान निश्चित केले आहे. श्रीकांतने उपांत्य फेरीत मिथुन मंजूनाथला मात दिली, तर त्रिशा-गायत्रीने मलेशियाच्या जोडीला हरवले.

माजी विजेते किदाम्बी श्रीकांतने उपांत्य फेरीत मिथुन मंजूनाथचा २१-१५, १९-२१, २१-१३ असा पराभव केला. सामन्यानंतर श्रीकांतने आपल्या विजयाचे रहस्य उलगडले. तो म्हणाला, ‘सामन्याची सुरुवात छान होणे माझ्यासाठी महत्त्वाचे होते. त्याच वेळी मला सफाईदार खेळास प्राधान्य द्यायचे होते. मिथुन (प्रतिस्पर्धी) माझ्याविरुद्ध कायम चांगली कामगिरी करतो. त्यामुळे त्याच्याविरुद्धच्या सामन्यात मला अधिक सजग राहावे लागते. एकूणच या कामगिरीवर मी खूश आहे.’ २०२१ मध्ये जागतिक रौप्यपदक जिंकणाऱ्या श्रीकांतने या मोसमात मलेशिया मास्टर्स स्पर्धेच्या अंतिम फेरीतही धडक मारली होती. आज, रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीत त्याचा सामना हाँगकाँगच्या जोसन गुनाववनशी होईल.
जागतिक दुहेरी क्रमवारीत १४व्या स्थानी असलेल्या त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनेही अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यांनी अचूक डावपेच आणि परिस्थितीला साजेसा नियंत्रित खेळ करत मलेशियाच्या आँग शिन येइ-कार्मन तिंग या जोडीचा २१-११, २१-१५ असा पराभव केला. या विजयामुळे त्यांनी जेतेपदाच्या लढतीत आपले स्थान पक्के केले आहे.